कल्याण : नव्या दुर्गाडी पुलाच्या २ लेन वाहतुकीसाठी खुल्या; वाहतूककोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:21 PM2021-05-31T20:21:29+5:302021-05-31T20:22:49+5:30
लोकार्पण सोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याण : नवीन दुर्गाडी पूल वाहतुकीसाठी कधी खुला केला जाणार ? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून विचारला जात होता. अखेर सोमवारी या पुलाच्या दोन लेनचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन, तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार आहे.
काही ना काही कारणामुळे नवीन दुर्गाडी पुलाच्या उभारणीसाठी विलंब होत होता. कल्याणहून भिवंडी, ठाणे आणि विशेषतः मुंबईला जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा समजला जातो. हजारो नागरिक या पुलाचा वापर करतात. मात्र, अस्तित्वात असलेला पूल अपुरा पडू लागल्याने नवीन दुर्गाडी पुल उभारणीचे प्रयोजन केले गेले. दुर्गाडी चौकात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तासनतास नागरिकांना या ठिकाणी थांबावे लागत होते. अखेर नवीन दुर्गाडी पुलाच्या दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असणारा हा प्रकल्प कल्याणसाठी अतिशय महत्वाचा होता. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. आज यापैकी नव्या २ लेनचे उद्घाटन झाले असून उरलेल्या ४ लेनचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना ६ नव्या आणि २ जुन्या अशा ८ लेन वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आल्याचेही ते म्हणाले.
सोशल डिस्टसिंगचा फज्जा
या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सोशल डिस्टसिंगचेही तीन तेरा वाजले होते. विशेष म्हणजे केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यामुळे नियम हे सर्व सामान्य लोकांसाठीच आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.