कल्याण : तिकीटाच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला दलालांकडून मारहाण
By मुरलीधर भवार | Published: May 23, 2023 06:08 PM2023-05-23T18:08:11+5:302023-05-23T18:13:17+5:30
कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
कल्याण-कल्याण रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर तिकीटाच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला दलालांकडून काल रात्री मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे कल्याण रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रात दलालांकडून दादागिरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दलालांची मजल आत्ता मारहाण करण्यापर्यंत गेली आहे.
काल एका माथेफिरूने एका तरुणीला मिठी मारल्याचा प्रकार घडल्यानंतर महिला प्रवासी सुरक्षित नसल्याची बाब समोर आली असता आत्ता दलालांची दादागिरी समोर आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट आरक्षणाकरीता कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट आरक्षण केंद्रावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. कोकण रेल्वेने कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग एका मिनिटात फुल्ल झाल्याने दलालांकडून तिकीट बुकींगकरताना काळा बाजार केला जातो हे समोर आले. परराज्यातील लोक सुट्टीत गावी जाण्याकरीता तिकीटासाठी रांग लावतात. त्यांना सहजासहजी तिकीट मिळत नाही. अनेकदा दिवसभर तिकीटाच्या रांगेत उभे राहून तिकीट मिळत नाही. त्याकरीता रात्री १२ वाजल्यापासून तिकीटासाठी रांग लावली जाते. तात्काळ तिकीट मिळविण्याकरीता दलालांकडून तिकीटासाठी रांग लावली जाते.
तिकीट खिडकीद्वारे आरक्षण सुरु होताच दलाल तिकीट खिडकीभोवती एकच गर्दी करतात. कल्याणहून बनारसला जाण्यासाठी तिकीटाच्या रांगेत संतोष राय नावाचा तरुण उभा होता. हा तरुण सलग तीन दिवस आरक्षण केंद्राच्या रांगेत होता. पहिल्या दिवशी त्याचा नंबर ५० वा होता. त्याला तिकीट मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा नंबर ११ वा होता. काल रात्री तो रांगेत उभा असताना काही जण त्याठिकाणी आले. त्यांनी रांग लावली नव्हती. ते थेट रांगेत घुसले. त्याला संतोष याने विरोध केला. रांग तोडत असल्याचा व्हिडीओ त्याने काढण्याचा प्रयत्न केला. दलालांनी त्याला मारहाण केली. त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील व्हिडीओ डिलीट केला. या घटनेची तक्रार संतोष यांने रेल्वे पोलिस ठाण्यात केली आहे.
कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी संतोष यांची तक्रार प्राप्त झाली असून या घटनेची गंभीर दखल घेऊन मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. दरम्यान आरपीएफ जवान यांनी घडलेली घटना मान्य करीत कठाेर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
दरम्यान कोकण रेल्वेतील तिकीट आरक्षणात झालेल्या गडबडीबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार करुन कारवाईची मागणी केली होती. आत्ता मनसे आमदार पाटील यांनी तिकीट आरक्षण केंद्रावरील तरुणाच्या मारहाण प्रकरणी दलालांच्या विरोधात कारवाई करुन तिकीट आरक्षण केंद्र दलालमुक्त करावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.