ऐकावे ते नवलच! कॉलेजने  कामचुकार प्राध्यापकांचीच यादी गेटवर लावली, शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 05:24 AM2022-01-04T05:24:15+5:302022-01-04T05:24:25+5:30

अग्रवाल कॉलेजचा प्रताप : शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय

Kalyan Agarwal college posted a list of not working professors at the gate | ऐकावे ते नवलच! कॉलेजने  कामचुकार प्राध्यापकांचीच यादी गेटवर लावली, शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय

ऐकावे ते नवलच! कॉलेजने  कामचुकार प्राध्यापकांचीच यादी गेटवर लावली, शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कमी उपस्थिती असल्यास विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू दिले जात नाही. मात्र, कमी लेक्चर घेणाऱ्या प्राध्यापकांची यादीच के. एम. अग्रवाल कॉलेजने प्रवेशद्वारात झळकविली आहे. त्यामुळे विषय शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा ठरला आहे.

कल्याण पश्चिमेला के. एम. अग्रवाल हे नामांकित कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये जुनिअर आणि पदवीचे विविध शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार ५०० इतकी आहे. या कॉलेजमध्ये जुनिअर आणि सिनिअरला मिळून १२५ प्राध्यापक विद्यादानाचे काम करीत आहे. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १०० आहे. कोरोनाकाळात कॉलेज बंद होते. ऑनलाइन शिक्षण सुरू होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ऑफलाइन शिक्षण सुरू झाले. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती आणि त्यांच्या शैक्षणिक अनियमिततेविषयी विविध नोटिसा कॉलेजकडून काढल्या जातात. त्याच प्रमाणे कॉलेजने ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सहा प्राध्यापकांच्या नावाची यादीच कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ लावली आहे. या प्राध्यापकांनी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान कमी लेक्चर घेतले आहे. हा फलकच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.

कॉलेजची शैक्षणिक कामगिरी चांगली - पांडे
प्राचार्या अनिता मन्ना यांनी सांगितले की, हा आमच्या कॉलेजच्या अंतर्गत विषय आहे. संबंधित प्राध्यापकांकडून कमी लेक्चर का घेतले याचा खुलासा मागविला आहे. त्यांचे खुलासे त्यांनी आम्हाला सादर केले आहेत. तर कॉलेजचे जॉईन सेक्रेटरी ओमप्रकाश पांडे यांनी सांगितले की, आमच्या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी चांगली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे.

समज देणे हा उद्देश
प्राध्यापक कमी लेक्चर घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना एक समज देण्यासाठी व त्यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या नावाचा फलक लावला. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यांच्या कामात सुधारणा होणे हेच यातून अपेक्षित आहे. कमी लेक्चर घेणाऱ्या एका प्राध्यापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात मी काही बोलू शकत नाही, एवढीच प्रतिक्रिया दिली. 

Web Title: Kalyan Agarwal college posted a list of not working professors at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण