पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद!
By पंकज पाटील | Published: July 19, 2023 12:56 PM2023-07-19T12:56:56+5:302023-07-19T12:57:28+5:30
प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
अंबरनाथ: अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे. रस्त्याच्या शेजारी असलेल्या कंपन्यांनी मोठा नाला बुजवल्यामुळे सर्व पाणी राज्य महामार्गाच्या एका मार्गीकेवर अडून राहिलं होतं. त्यामुळे हा राज्य महामार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला. प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. याउलट या राज्य महामार्गाच्या बाजूला असलेल्या कंपन्या राजरोसपणे मुख्य नाला अरुंद करण्याचे काम करीत आहे.
एवढेच नव्हे तर काही कंपन्याने थेट नालाच वळवल्याने सर्व पाणी राज्य महामार्गावर येत आहे. जे पाणी नाल्यातून वाहून जाणे गरजेचे आहे ते पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे राज्य महामार्गालाच नाल्याचे स्वरूप आले होते. बदलापूर दिशेकडील एक मार्ग पूर्णपणे बंद करण्याची वेळ वाहतूक विभागावर आली होती. तर दुसऱ्या मार्गिकेवरून संथ गतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.
पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की या पाण्यात काही वाहने बंद देखील पडले होते. तर काही वाहनांनी या भर पाण्यातून मार्ग काढत बदलापूर गाठले. प्रत्येक पावसात हा राज्य महामार्ग बंद होत असला तरी यंदा या महामार्गावर तब्बल चार फुटावून अधिक पाणी साचल्याने प्रशासन किती कुचकामी आहे याचा प्रत्यय नागरिकांना अनुभवता आला.