कल्याण: अतिधोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात; पालिका आयुक्तांनी दिले होते निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 07:44 PM2021-06-15T19:44:31+5:302021-06-15T19:44:49+5:30
पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारती तोडण्याचे देण्यात आले होते निर्देश
कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची पाहणी नुकतीच केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केली होती. अतिवृष्टीच्या काळात दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारती तोडण्याचे निर्देशही आयुक्तांनी प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील, वसंत निवास ही अतिधोकादायक इमारती तोडण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली.
ही तीन मजली इमारत १९६६ साली बांधण्यात आली होती. या इमारतीला २०१७ पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्यातील व्यावसायिक गाळयांमध्ये वापर सुरू असल्यामुळे त्यांचे पाणी कनेक्शन कट करून व त्यांचा वापर बंद करून आणि दोन रहिवासी यांना रहिवास मुक्त करून निष्कासनाचे काम ह प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते महापालिकेच्या ३० कामगारांच्या मदतीने सुरू केले असून इमारतीच्या पूर्ण निष्कासनाची कारवाई येत्या ५ दिवसात पूर्ण होईल असे केडीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जे प्रभागातही उल्हासनगर वालधुनी या रस्त्यांवर असलेली स्वागत गेटची लोखंडी कमान धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे जे प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी उपअभियंता सुनिल वैद्य, तसेच जे प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या मदतीने काढून टाकली. सदर लोखंडी कमानीची विल्हेवाट ही बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असल्याचं केडीएमसीने स्पष्ट केले आहे.