कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रत्येक कामाचा अनुपालन अहवाल द्यावा; रविंद्र चव्हाण यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:59 PM2021-09-17T15:59:05+5:302021-09-17T16:00:02+5:30
आयुक्तांची घेतली भेट : दोन तास विकास कामांवर चर्चा
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विकास कामे रखडलेली आहे. ती मार्गी लावली जात नाही. कदाचित कोरोना काळात ही कामे मंद गतीने सुरु होती. मात्र प्रत्येक विकास कामांचा अनुपालन अहवाल दिला गेला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
आज आमदार चव्हाण यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. या वेळी दोन तास विविध विकास कामांच्या संदर्भात त्यांनी आयुक्तांसोबत चर्चा करुन ही विकास कामे मार्गी लावण्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक विकास काम किती वेळेत पूर्ण केले जाते. याची मुदत ठरवून दिलेली असते. त्याचा कामाचा अनुपालन अहवाल असे म्हणतात.
आमदार चव्हाण यांनी आयुक्तांसोबतच्या चर्चेत मुद्दा उपस्थित केला की, महापालिका हद्दीतील बीएसयूपी घरकूल योजनेतील साडे चार हजार लाभार्थीना अद्याप घरे वाटप करण्यात आलेली नाही. त्याचा निर्णय लटकलेल्या अवस्थेत आहे. त्यावर आयुक्तांनी हा विषय येत्या तीन महिन्यात मार्गी लावण्यात येईल असे सांगितले.
आमदार चव्हाण यांनी डोंबिवली स्टेशन परिसरातील मच्छी मार्केटचा विषय पुन्हा उपस्थित केला. या कामाची निविदा काढण्यात आली होती. आत्ता पुन्हा पात्र आणि अपत्रतेचा मुद्दा कसा काय उपस्थित झाला. रेल्वेने देखील या प्रकल्पासाठी जागा देण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर ठाकूर्ली रेल्वे उड्डाण पूल झाला आहे. मात्र त्याची ठाकूर्लीच्या दिसेने उन्नत मार्गिका तयार करण्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या कामास गती देण्यात यावी. त्याचबरोबर डोंबिवलीतील एकही एसटीपी कार्यारत नाही. तो कार्यरत केला जावा. सगळी घाण खाडीत सोडली जात आहे. त्यामुळे खाडी प्रदूषित होत आहे. त्याकडे महापालिकाच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा आमदार चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेने परदेशी कंपन्यांसोबत करार करुन स्मार्ट सिटी अंतर्गत तसेच टीपी स्कीम अंतर्गत काही विकास प्रकल्पांचे प्रस्ताव तयार केले होते. त्याचे पूढे काय झाले असा सवाल आमदार चव्हाण यांनी उपस्थित करुन टीपी स्कीम मार्गी लावण्यात याव्यात. या स्कीममध्ये लॅण्ड बँक आहेत. त्यांच्या विकासातून महापालिकेच्या तिजोरीत पैसा जमा होणार आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ कल्याणच्या श्रीदेवी आणि डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात मिळत आहे. या योजने अंतर्गत उपचारासाठी सोय महापालिकेच्या रुग्णालयास अन्य रुग्णालयातून मिळावी. महापालिकेच्या रुग्णालयात साधन सामुग्री दिली जात असताना त्याच जोडीला डॉक्टर नर्स अन्य स्टाफ पुरविला गेला पाहिजे. याकडेही आमदार चव्हाण यांनी लक्ष वेधले.