उष्णतेचा कहर! कल्याण डोंबिवलीत 5 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; पारा पोहोचला 43 अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 05:06 PM2022-03-17T17:06:47+5:302022-03-17T17:08:16+5:30
Kalyan Dombivali Temperature : हवामान खात्याने मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्याला दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानूसार कल्याण डोंबिवलीमध्येही तापमानाचा पारा चढताच दिसत आहे.
कल्याण - डोंबिवली - गेल्या 3 दिवसांपासून कडक उन्हामुळे होरपळून निघालेल्या कल्याणडोंबिवलीतीलतापमानाने आज नवा उच्चांक केलेला पाहायला मिळाला. कल्याणमध्ये आज तब्बल 43 अंश सेल्सियस तर डोंबिवलीत 42.8 अंश सेल्सियस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 नंतरचे हे कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक तापमान ठरले आहे. कल्याण डोंबिवलीत अक्षरशः विदर्भातील उन्हाळ्याप्रमाणे चटके बसत आहेत.
हवामान खात्याने मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्याला दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानूसार कल्याण डोंबिवलीमध्येही तापमानाचा पारा चढताच दिसत आहे. भयानक उकाड्याचा आजचा लागोपाठ 4 दिवस असून मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान आज नोंदवण्यात आले. याआधी 27 मार्च 2017 मध्ये कल्याणात 43 अंश सेल्सियसची नोंद झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2019 मध्येही 41 ते 42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. तसेच कल्याणप्रमाणे डोंबिवलीतही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच 42.8 अंश सेल्सियस इतक्या चढ्या तापमानाची नोंद झाली आहे. ही तापमान वाढ म्हणजे उष्णतेच्या लाटेचाचा परिणाम असून विदर्भात ज्याप्रमाणे कडक ऊन असूनही घाम येत नाही अगदी तशीच परिस्थिती आपल्याकडेही निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीच्या तुलनेत कमी शहरीकरण झालेल्या बदलापूरमध्येही आज गेल्या 10 वर्षांतील उच्चांकी असे 42.9 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेल्याचे ते म्हणाले. तर ज्याप्रमाणे गेले 4 दिवस दररोज 1 ते दिड अंश सेल्सियस या प्रमाणात हे तापमान जसे वाढत गेले. अगदी त्याचप्रमाणे उद्यापासून (शुक्रवार 18 मार्चपासून) हळूहळू हे तापमान कमी होऊ लागेल अशी महत्वाची माहीतीही मोडक यांनी दिली आहे. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत हे तापमान कमी म्हणजे 37 ते 38 अंश सेल्सियसपर्यंत राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या शहरात आज नोंदवण्यात आलेले तापमान
कल्याण - 43
डोंबिवली - 42.8
बदलापूर - 42.9
उल्हासनगर - 42.8
ठाणे - 42.5
भिवंडी - 43
नवी मुंबई - 42.3
कर्जत - 44.5