... म्हणून संतापलेल्या रिक्षाचालकांनी घातला वाहतूक पोलिसांना घेराव, वाचा नक्की काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 02:13 PM2022-03-29T14:13:37+5:302022-03-29T14:14:34+5:30
रिक्षाचालकांचा पारा चांगलाच चढल्याचं दिसून आलं होतं.
मयुरी चव्हाण
कल्याणडोंबिवली शहरात रिक्षाचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलीस यांच्यात नेहमीच शाब्दीक चकमक उडत असते. त्यातच आता ई चलान प्रक्रियेमुळे नवीन वाद निर्माण होताना दिसत आहेत.
मंगळवारी सकाळी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक परिसरात रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं. एका रिक्षाचालकाला दोन तासात एकाच वाहतूक कर्मचाऱ्याने दोन फाईन मारल्यानं रिक्षाचालकांचा पारा चांगलाचं वाढला होता. काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रिक्षाचालकांनी आपला मोर्चा वाहतूक शाखेच्या कार्यालयात वळवला. मार्च एडिंगमुळे अशा कारवाया होतात असा आरोपही रिक्षा चालकांकडून करण्यात आला.
दिनेश मेहता नावाच्या रिक्षाचालकाला दोन तासात दोन फाईन ई चलान प्रक्रियेच्या माध्यमातून आकारण्यात आले. यानंतर मंगळवारी सर्व रिक्षाचालक इंदिरा चौकात जमा झाले. यावेळी उपस्थित असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांना घेराव घालून दंडाबद्दल जाब विचारण्यात आला. रिक्षाचालकांच्या बाजू कोणीच विचारात घेत नाहीत अशी खंत ही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर वाहतूक विभागाच्या कार्यालयात रिक्षाचालकांनी आपला मोर्चा वळवला.
ई चलान बाबत अनेक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. तसेच फ्रंट सीटचा नियम केवळ सकाळी लागू केला जातो. संध्याकाळी गर्दी असल्याने डोळेझाक केली जाते. मग सकाळी वेगळा नियम गर्दी असल्यावर वेगळा नियम का? असा सवालही विचारण्यात आला. अशा पद्धतीने फाईन लावला गेला तर आम्ही कमवायचा किती ? घर कसं चालवायचं आणि फाईन तरी किती भरायचा? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली.
दोन तासात एकाच कर्मचाऱ्याकडून एका रिक्षाचालकाला दोन फाईन मारण्यात आले. कमवायचे किती आणि दंड भरायचा तरी किती? हे सर्व थांबलं नाही तर वाहतूक शाखेवर मोर्चा काढू. केवळ मार्च एडिंगचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे.
दत्ता माळेकर,
भाजप प्रणित रिक्षाचालक मालक संघटना
ई चलानबाबत जनजागृती करण्यासाठी एक मेळावा आयोजित करण्यात येईल. डिजिटल प्रक्रिया असल्याने फाईन सोबत फोटोही जोडला जातो. तरी याबाबत अधिक चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
उमेश गित्ते
पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा