KDMC Budget 2022: कल्याण-डोंबिवलीला बनवणार क्रीडानगरी; कबड्डीसाठी ५० मैदाने, आयुक्तांचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:11 AM2022-03-05T11:11:24+5:302022-03-05T11:12:13+5:30
केडीएमसी हद्दीत विविध खेळांसाठी मैदाने विकसित करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीत विविध खेळांसाठी मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. या शहराची ओळख क्रीडानगरी व्हावी, असा संकल्प मनपाचे प्रशासक व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी अर्थसंकल्पाद्वारे केला आहे. खेळाच्या मैदानावर कोणतेही राजकीय, लग्नसमारंभ आयोजित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. मैदाने ही केवळ खेळासाठी असतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मनपा हद्दीत कबड्डीची ५० मैदाने, फुटबॉलसाठी तीन, क्रिकेटसाठी पाच, व्हॉलीबॉलसाठी २५ आणि खो-खोसाठी १० मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. या सर्व प्रकारच्या खेळाचे सामने कल्याण-डोंबिवलीत भरविले जातात. मैदाने उपलब्ध झाल्यावर खेळांसह खेळाडूंना वाव मिळेल. मनपाच्या आरक्षित जागेवर इनडोअर कबड्डी स्टेडियम आणि बारावे येथे फुटबॉल स्टेडियम तयार केले जाईल. खंबाळपाडा येथे एक अत्याधुनिक क्रीडा संकुल असेल. ‘फ्रीडम टू वॉक’ स्पर्धेत देश पातळीवर केडीएमसीचा पहिला क्रमांक आला. त्यामुळे खेळ व आरोग्याच्या सेवा पुरवून ‘माय सिटी, फिट सिटी’ बनविण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला.
आयुक्तांनी दिली प्रांजळ कबुली
मागील दोन वर्षांत अर्थसंकल्पात ठेवलेली उद्दिष्टे कोरोनामुळे १०० टक्के पूर्ण करता आली नाहीत. परिस्थिती अनुकूल राहिल्यास ती उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या तरतुदी
- प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी
- निळजे, उंबर्डे, गौरीपाडा या तीन तलावांसह एकूण पाच तलावांचा विकास व सुशोभीकरण
- बायो डायव्हर्सिटी पार्क, ट्रॅफिक पार्क, दिव्यांगासाठी उद्यान
- नेहरू तारांगण सेंटरच्या धर्तीवर तारांगण
- वृक्ष गणना करणार
- नागरिकांना सर्व सेवा देण्यासाठी एक खिडकी योजना, सर्व सेवा ऑनलाईन देणार
- भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन कुशीवली, कोंढाणे आणि पोशीर धरणे केडीएमसीस मिळविता यासाठी पाठपुरावा
- बारावे जलशुद्धीकरण येथे नव्याने सेंट्रीफ्यूज यंत्रणा उभारून वाया जाणाऱ्या ५० टक्के पाण्याचा पुनर्वापर