कल्याण-डोंबिवलीकरांची ‘हॅप्पी सकाळ’; मनोरंजातून दिला फिटनेसचा मंत्र
By प्रशांत माने | Published: January 7, 2024 02:26 PM2024-01-07T14:26:16+5:302024-01-07T14:27:24+5:30
मौज, मस्ती आणि फुल टू धमाल, सुप्त कलागुण आणि कौशल्यांना वाव मिळण्यासाठी चौकाचौकात व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.
कल्याण: ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील कल्याणडोंबिवलीमध्ये पोलिस वर्धापन दिन सप्ताह निमित्ताने आज सकाळी ६ ते १० या कालावधीत हॅपी स्ट्रीटचा उपक्रम राबविण्यात आला. फन, फिटनेस आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार यानिमित्ताने दोन्ही ठिकाणी पाहायला मिळाला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तरूण-तरूणी, नर्तक, गायक या सगळयांचाच उस्फुर्त सहभाग या उपक्रमाला लाभला. त्यांच्यातील सुप्त कलागुण आणि कौशल्यांना वाव मिळण्यासाठी चौकाचौकात व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.
कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी तर कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांच्या वतीने केले होते. डोंबिवलीत फडके रोडवरील कार्यक्रमात हॅपी स्ट्रीटची आकर्षक आणि भव्य रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. लेझीम, पोलिस बँड पथकांनी जल्लोषात अधिकच भर घातली. योगा, मल्लखांब प्रात्यक्षिक तसेच झुंबापासून ते हिंदी-मराठी लोकप्रिय गाण्यांवर डोंबिवलीकरांची पावले थिरकली. यात पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांनीही नृत्य करण्याचा मनमुराद आनंद लुटला. गुढीपाडवा, दिवाळी पहाटच्या निमित्त फडके रोडवर पाहायला मिळणारा उत्साह रविवारी देखील हॅपी स्ट्रीटच्या निमित्ताने अनुभवता आला. मोठया संख्येने डोंबिवलीकर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.
हॅपी स्ट्रीटमध्ये अवतरले प्रभू रामचंद्र, सितामाई
देशभरात प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळयाची धामधूम सुरू असताना रविवारी कल्याण मधील वसंत व्हॅलीत पार पडलेल्या हॅपी स्ट्रीटमध्ये श्री प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमानाची साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. हॅपी स्ट्रीटच्या निमित्ताने वसंत व्हॅली परिसर सकाळपासूनच लहान मुल, तरूण-तरूणी, ज्येष्ठ नागरिक, खेळाडु, नर्तक, गायक आदिंनी फुलुन गेला होता. पारंपारिक आणि आधुनिक खेळ, बहारदार नृत्य, गाणी, योगा,सेल्फ डिफेन्स, फेस पेंटिंग, स्ट्रीट पेंटिंग ची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. व्हॉलीबॉलपासून कराटे, बॉक्सिंगपर्यंत आणि झुंबापासून लावणीपर्यंतच्या नृत्याचा आनंद यावेळी घेण्यात आला. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक एस एस पाटील, माजी नगरसेवक सुनील वायले यांच्यासह अनेकांनी उस्फुर्तपणे हॅपी स्ट्रीटमध्ये सहभाग घेतला.