ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:32 AM2024-06-17T10:32:12+5:302024-06-17T10:33:21+5:30
Kalyan Durgadi Fort : दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला
कल्याण : कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लीम समुदायाने येथील मशिदीत नमाज अदा केली. मात्र, बकरी ईदच्या दिवशी येथील दुर्गाडी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. त्यामुळे या बंदीविरोधात आज दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. तसेच, आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, अशीही भूमिका घेतली.
दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला. तसेच, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यांचे कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. याशिवाय, पोलिसांनी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यापासून शिवसैनिकांना रोखले. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, बाळासाहेब ठाकरेंनी बंदीहुकूम मोडून देवीचे दर्शन घेतले होते. आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरुच राहील. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी असता कामा नये. देवीचं दर्शन घेणं हा हिंदूंचा हक्क आहे, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे. तसेच त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लीम समुदाय बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतो. त्यामुळे बकरी ईद निमित्त दोन धर्मामध्ये कोणतेही वाद होऊ नये, यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लीम बांधव नमाज पठण करत असताना पोलिसांकडून हिंदु बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. दरम्यान, ९० च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केले होते. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी घंटानाद करताना दिसत आहेत.