कल्याणमध्ये वीज कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू
By मुरलीधर भवार | Published: March 6, 2024 04:42 PM2024-03-06T16:42:13+5:302024-03-06T16:42:26+5:30
प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार
कल्याण- विविध मागण्यांसाठी महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी कल्याणमधील महावितरणच्या कार्यालयात बाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कंत्राटी कामगारांना सरकारकडून वारंवार आश्वासन दिली जातात मात्र कृती समिती सोबत बैठका घेतल्या जात नाहीत ,ठोस निर्णय घेतला जात नाही. या निषेधार्थ वीज कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे. कंत्राटी कामगारांच्या या काम बंद आंदोलनामुळे महावितरणचे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेते ? हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे.
संघटनेच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांना एकूण पगारात ३० टक्के वेतन वाढ द्यावी, कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा द्यावी ,महावितरण ,महानिर्मिती व महापारेषण अंतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत आधी कंत्राटी कामगारांना सांगून घ्यावे त्यानंतर उर्वरित भरती प्रक्रिया राबविण्यात यावी या प्रमुख मागण्यांचा इतर काही मागण्या सरकार कडे करण्यात आल्यात . गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनेचा या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे . मात्र अद्यापही आश्वासना पलीकडे कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचा आरोप कामगार संघटनेचे पदाधिकारी मनोज मनुचारी यांनी केला आहे.