Kalyan: केडीएमसीच्या कर्मचा-यावर खंडणीचा गुन्हा! आरोपींमध्ये अन्य तिघांसह माहिती अधिकार कार्यकर्त्याचा समावेश
By प्रशांत माने | Published: August 1, 2024 08:00 PM2024-08-01T20:00:55+5:302024-08-01T20:01:17+5:30
Kalyan News: बांधकाम व्यावसायिकाकडून ४१ लाख रूपये रोख आणि चार सदनिका जबरदस्तीने खंडणी स्वरूपात घेतल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या एका कर्मचा-यासह अन्य चौघांवर विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचाही समावेश आहे.
- प्रशांत माने
डोंबिवली - बांधकाम व्यावसायिकाकडून ४१ लाख रूपये रोख आणि चार सदनिका जबरदस्तीने खंडणी स्वरूपात घेतल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या एका कर्मचा-यासह अन्य चौघांवर विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचाही समावेश आहे.
विनोद लकेश्री, प्रशांत शिंदे, महेश निंबाळकर, विलास शंभरकर आणि परेश शहा अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत. यातील लकेश्री हे केडीएमसीत वाहन चालक आहेत तर निंबाळकर हे माहीती अधिकार कार्यकर्ते आहेत. बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल गोरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. गोरे यांच्या तक्रारीनुसार त्यांचे डोंबिवलीत डिसेंबर २०१८ पासून ते ३० जुलै २०२४ या कालावधीत कुंभारखाणपाडा, देसलेपाडा, कोपररस्ता, गोग्रासवाडी भागात बांधकाम प्रकल्प सुरू होते. हे बांधकाम प्रकल्प बेकायदेशीर आहेत आणि ते तोडण्याबाबत सोशल मिडीयावर तसेच केडीएमसीत व इतर सरकारी कार्यालयांमध्ये संबंधितांनी तक्रार अर्ज केले. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी माझ्याकडून जबरदस्तीने ४१ लाख रूपयांची रोकड आणि डोंबिवली येथील चार सदनिका जबरदस्तीने घेतल्याचा आरोप गोरे यांनी पाच जणांवर केला आहे. या तक्रारीवरून संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ठाणे खंडणी विरोधी पथक करीत आहेत.
लकेश्री यांच्यावर २७ नोव्हेंबरला प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात चार मारेक-यांना अटक करण्यात आली. तपासात मोगली नामक व्यक्तीने हल्ल्याची सुपारी दिल्याचे समोर आले होते. परंतू सुपारी देणारा मोगली आणि या हल्ल्यामागचा सूत्रधार आठ महिने उलटूनही पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान लकेश्री यांच्यावर आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आवाज दाबण्यासाठी खोटा गुन्हा
आपण डोंबिवलीतील सर्व बेकायदा बांधकामांच्या तक्रारी अनेक वर्ष पालिकेत करत आहोत. त्याविरूध्द आपली उपोषण सुरू आहेत. आपण बेकायदा बांधकामांविरोधात आवाज उठवितो म्हणून आपला आवाज दाबण्यासाठी आपणास खोटया गुन्हयात अडकविण्याचा हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया माहीती अधिकार कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी दिली. दरम्यान विनोद लकेश्री यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.