कळव्यातील आगीची कल्याणमध्ये पुनरावृत्ती, स्क्रॅप वाहनांना लागली आग
By प्रशांत माने | Published: March 19, 2024 07:05 PM2024-03-19T19:05:09+5:302024-03-19T19:06:13+5:30
कळव्यातील खारेगावात स्क्रॅप वाहनांना लागलेल्या आगीची पुनरावृत्ती कल्याण पश्चिमेत मंगळवारी घडली.
कल्याण: कळव्यातील खारेगावात स्क्रॅप वाहनांना लागलेल्या आगीची पुनरावृत्ती कल्याण पश्चिमेत मंगळवारी घडली. येथील जोशीबाग परिसरात मच्छी मार्केटच्या मागील बाजूस पोलिस वसाहतीमधील आवारात जप्त केलेल्या भंगार अवस्थेतील वाहनांना भीषण आग लागल्याची घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. यात २० ते २५ गाडया जळाल्या असून या आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
घटनास्थळी पोलिसांकडून गुन्हयात जप्त केलेल्या तसेच अपघातामधील वाहने ठेवण्यात आली आहेत. ४५ ते ५० दुचाकी होत्या. दोन रिक्षा, दोन कार भंगात अवस्थेत त्याठिकाणी होत्या. दुपारी अचानक आग लागली आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले गेले. आगीचे स्वरूप मोठे असल्याने अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अर्धा ते पाऊणतास लागल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली.
घटनास्थळी जायला रस्ताच नव्हता
आग पोलिस वसाहतीच्या आवारात ठवलेल्या वाहनांना लागली होती. परंतू अग्नीशमन दलाच्या बंबांना त्याठिकाणी जायला रस्ताच नव्हता. तो अरूंद असल्याने अखेर रामबाग परिसरात बंब नेऊन तेथील चाळीतून आत प्रवेश करीत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
आता तरी यंत्रणांना जाग येईल का?
कळव्यातील आगीच्या पार्श्वभूमीवर लोकमतने सोमवारच्या रिअॅलिटी चेकच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील भंगार वाहने खितपत पडली असल्याकडे लक्ष वेधले होते. या वाहनांना कळव्यातील घटनेप्रमाणे आग लागून नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तविली होती. दरम्यान आता आगीची घटना घडल्यावर तरी यंत्रणांना जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.