पिण्यासाठी पाणी न दिल्यानं टोळक्याकडून घरात घुसून मारहाण; शेजारच्या ६ गाड्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 03:45 PM2020-11-17T15:45:15+5:302020-11-17T15:46:22+5:30
स्थानिक गावगुंडांनी मारहाण, तोडफोड केल्याचा आरोप; पोलिसांकडून शोध सुरू
कल्याण: कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली परिसरात एकाच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर सहा गाड्या फोडण्यात आल्या आहेत. आईस्क्रीमवाल्याकडे पाणी मागितले. त्याने दिले नाही म्हणून हा प्रकार घडला आहे. ही मारहाण, तोडफोड ही स्थानिक गावगुंडांकडून करण्यात आल्याची फिर्यादी महिलेचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे.
खडेगोळवली परिसरात राहणारे रवी म्हात्रे व त्यांच्या पत्नी पार्किंगचा व्यवसाय करतात. त्याच जागेत ते एक वडापावची गाडी चालवतात. त्यांच्या शेजारी असलेल्या आईस्क्रीमवाल्याकडे काही तरुण आले. त्यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्याला त्यांनी दमदाटी केली. त्याच्या मदतीला लता म्हात्रे धावल्या. त्यानंतर ते तरुण परत गेले. मात्र रात्री ते दहा ते पंधरा जण पुन्हा आले. त्यांनी म्हात्रे यांच्या घरात घुसून साहित्याची तोडफोड केली. तसेच सहा गाड्या फोडल्या. या दरम्यान म्हात्रे यांच्या घरातील दागिने व रोकड लंपास आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईस्क्रीमवाल्याकडे तरुणांनी पिण्याकरीता पाणी मागितले होते. या कारणावरुन ही घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून पुढील तपास सुरू आहे.
कालच कल्याण पूर्वेला ज्वेलर्सला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा उपरोक्त घटना घडल्याने कल्याणमध्ये नेमके चालले आहे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.