Kalyan: कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील दरड कोसळली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By मुरलीधर भवार | Published: July 15, 2024 06:40 PM2024-07-15T18:40:42+5:302024-07-15T18:41:08+5:30
Kalyan News: कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील दरड आज पावसामुळे कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. ही घटना घडताच नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील दरड आज पावसामुळे कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. ही घटना घडताच नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेने टेकडी परिसरात राहणाऱ्या १४० कुुटंबियांना घरे खाली करण्याच्या नोटिसा या पूर्वीच बजावल्या आहेत.
कल्याण डाेंबिवली परिसरात गेल्या तीन दिवसापासून चांगला पाऊस पडत आहे. पावसामुळे कचोरे टेकडीवरील झाडांच्या मूळाची असलेली माती जाेरदार पाण्याने वाहून केली आहे. परिमाणी आज दुपारी कचोरे टेकडीवरील दरड खाली कोसळली. त्यासोबत मातीचा काही भागही स्खलीत झाला. हा प्रकार घडताच नागरीकांनी भयभीत होत त्याठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची पाहणी केली. नागरीकांना घरे स्थलांतरीत करण्याचे आवाहन केले. हिले यांनी सांगितले की, टेकडीपरिसरातील १४० नागरीकांना यापूर्वीच घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. काही नागरीक घरे साेडून जातात. पाऊस थांबला की पुन्हा त्याठिकाणी येतात.
मात्र पावसामुळे दरड कोसळल्याने नागरीकांची जिवित सुरक्षितता लक्षात घेता त्यांनी घरे सोडावी असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यांना महापालिकेच्या शाळेत राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.