कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भीख मांगो आंदोलन
By अनिकेत घमंडी | Published: March 11, 2024 12:45 PM2024-03-11T12:45:32+5:302024-03-11T12:45:36+5:30
लांबपल्यांच्या गाड्यांना प्राधान्य, उपनगरी प्रवाशांकडे दुर्लक्ष या धोरणाविरोधात भूमिका
डोंबिवली - जास्त निधी, नफा देणाऱ्या प्रवाशांसाठी लांबपल्यांच्या गाड्या, मालगाड्या यांना प्राधान्य देऊन उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या समस्या, मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या दुटप्पी विरोधात कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भीख मांगो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सर्व स्थानकात ३१ मार्च पर्यंत भीक मागून जमा होणारा पैसा हा रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे मंत्रालय मध्य रेल्वेचे मुख्यव्यवस्थापकांना दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.
वर्षानुवर्षे कसारा -कर्जत मार्गांवरील रेल्वे प्रवास हा वाढत्या नागरीकरणामुळे वाढलेली गर्दीमुळे दिवसेंदिवस यातनादायक, नकोसा झालाय. त्या मार्गांवर निधीअभावी प्रवाशांना प्राथमिक आणि मूलभूत सुविधा मिळत नाहीत. या मार्गांवर मेल एक्सप्रेस मालवाहतूक जादा गाड्या असो वा श्रीमंतांकरिता वंदे भारत सारख्या ट्रेन्स चालवल्या जात आहेत. त्या तुलनेत ६ वर्षांपासून एकही जादा लोकल फेरी चालविली जात नाही. ज्या सुरु आहेत त्या पण वेळापत्रकाप्रमाणे चालवत नाहीत. रोज सुमारे २० मि. नियोजित वेळापत्रकाच्या उशिरा लोकल धावत असल्याने सामान्यांना कामाच्या ठिकाणी लेटमार्कला सामोरे जावे लागते असं संघटनांनी सांगितले.
त्याऐवजी मेल एक्सप्रेस मालवाहतूक, वंदे भारत सारख्या गाडयांना चालविण्यास प्राधान्यक्रम दिला जातो. नवीन मार्गीका विस्तारिकरण होत नाही तोपर्यंत या भागात जादा लोकल फेऱ्या वाढविणे शक्य नाही असे उत्तर रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येते. थर्ड कॉरिडॉर बनवण्यासाठी निधी मिळत नसेल तर सामान्य।प्रवाशांकडून भीक मागुन उभा करण्याशिवाय पर्याय नाही असे घनघाव यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.