Kalyan Lok Sabha Election : कल्याणमधील भाजपा-शिवसेनेतील वाद मिटला! गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदेंना दिला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 08:35 PM2024-04-07T20:35:14+5:302024-04-07T20:39:42+5:30
Kalyan Lok Sabha Election : कल्याणमध्ये गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे.
Kalyan Lok Sabha Election : काल कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. पण, गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भाजपा समर्थक आणि शिवसेना समर्थकांमध्ये वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असेलतर भाजपाचा एकही कार्यकर्ता काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका भाजपा समर्थकांनी घेतली होती. दरम्यान, आज भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात भाजप वरिष्ठांना यश आले आहे.
वरुण गांधी भाजपमधून बाहेर पडणार का? मनेका गांधी यांनी केला खुलासा
यामुळे आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरील अडचणी कमी झाल्याचे दिसत आहे. याबाबत आज कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी काल डॉ.श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गणपत गायकवाड स्वत: किती अडचणीत असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेनुसार या भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील, असंही भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी म्हणाले.
कल्याणमध्ये गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात वाद झाला होता. त्या वादातुनच शिवसेनेचा उमेदवार असेल तर आम्ही काम करणार नसल्याचे भाजपा समर्थकांनी म्हटले होते.
दरम्यान, आज भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी कल्याण पूर्वेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. यानंतर कल्याण येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याच कार्यालयात नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर पडदा पडल्याचे सांगितले.