कल्याण : डॉक्टरांनी दिली अनाथाश्रम व वृद्धाश्रमात वैद्यकीय सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:04 PM2021-07-02T17:04:42+5:302021-07-02T17:06:35+5:30
कल्याण आयएमएचा स्तुत्य उपक्रम. डॉक्टर्स डे च्या निमित्तानं आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम.
कल्याणडोंबिवली शहरात विविध ठिकाणी "डॉक्टर्स डे" च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे गेल्या दीड वर्षाच्या कोरोना संकटाच्या कालावधीत अनाथाश्रम व वृद्धाश्रमातील व्यक्तींना योग्यरीत्या वैद्यकीय सेवा मिळाली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी डॉक्टरांकडे जाणे टाळले तर कोरोनाशी दोन करण्यासाठी सर्व यंत्रणा व्यस्त असल्याने अशा घटकांपर्यंत पोहचणे डॉक्टरांनाही शक्य झाले नाही. ही बाब लक्षात घेता इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण यांच्या वतीने "डॉक्टर्स डे"चे औचित्य साधून शहरातील अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
टिटवाळा येथील जीवन संवर्धन अनाथाश्रम, अंबरनाथ एमआयडीसी येथील कमलधाम वृद्धाश्रम आणि डोंबिवली पूर्वेकडील मैत्री वृद्धाश्रम या ठिकाणी आयएमएच्या तीन डॉक्टरांच्या टीमने भेट दिली. रक्तदाब, डायबेटिस, त्वचा तसेच डोळे व गुडघेदुखी सांधेदुखी इत्यादी तपासण्या यावेळी करण्यात आल्या. अनाथाश्रमात चाळीस मुलांची तपासणी करण्यात आली. यापैकी सहा मुलांना ऍनिमिया असल्याचे समोर आले तर दोन मुलांना तीव्र ऍनिमिया असल्याच आढळून आले. सर्व मुलांचे रक्तगट देखील तपासण्यात आले. वृद्धाश्रमातील एकूण 60 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये डोळे तपासणीच्या वेळी ज्यांना स्पष्ट दिसण्याबाबत अडथळा आला अशा नागरिकांना शासकीय योजनेअंतर्गत पुढील वैद्यकीय सेवा कल्याणमधील इशा नेत्रालय रुग्णालयात देण्यात येणार आहे.
50 डॉक्टरांची टीम या विविध उपक्रमात सहभागी झाली होती. यावेळी जेवणासोबतच आवश्यक असलेल्या हेल्थ किटचे देखील वाटप करण्यात आले. डॉ सुरेखा ईटकर, डॉ हर्षल निमकंदे, डॉ हिमांशू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व उपक्रम संपन्न झाल्याचे कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी सांगितले.
आजोबांनी जिंकली सर्वांची मने
हेल्थ चेकअप करताना यावेळी 101 वर्षाच्या चांदोरकर आजोबांनी सर्वांची मने जिंकली. एरवी तसे हे आजोबा फारसे बोलत नाहीत. मात्र क्रिकेटची भाषा त्यांना समजते. क्रिकेटचा विषय काढला की ते बोलते होतात.ते माजी रंजी प्लेयर होते अशी माहिती देखील समोर आली. आजोबांची क्रिकेटची आवड पाहून त्यांना सिझन बॉल डॉक्टरांनी भेट म्हणून दिला.