.... म्हणून एका 'कल्याणकराने' धाडली 'केडीएमसी'लाच नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 06:28 PM2021-09-21T18:28:06+5:302021-09-21T18:28:46+5:30
वाचा काय आहे प्रकरण?
मयुरी चव्हाण
कल्याणडोंबिवली महानगरपालिका नेहमीच विविध विषयांवर नेहमी इतरांना नोटीसा धाडत असते. मात्र आता कल्याण शहारातील एका रस्त्याच्या समस्येला वैतागून नागरिकांनीच केडीएमसी प्रशासनला नोटीस दिली आहे. वर्षानुवर्षे महापालिकेला पत्र देऊन कोणताच उपयोग होत नसल्यानं अखेरचा पर्याय म्हणून ही नोटीस दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, केडीएमसी प्रशासनानेही नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केडीएमसीच्या 'क' प्रभाग क्षेत्रातील 'वलीपीर रोड' या रस्त्याची डागडुजी करताना केवळ दगड मातीचा उपयोग केला जात आहे. पूर्णपणे रस्ता खणून डागडुजी न करता त्याची उंची वाढवली जात असल्यानं आजूबाजुच्या नागरिकांच्या घराचे अनेक प्रकारे नुकसान होत असल्याच या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
कल्याण शहरातील नागरिक उजैर नजे यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाला नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून "वलीपीर रोड" हा योग्य व रीतसर पद्धतीने दुरुस्त केला गेला नाही. या कारणाने दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था होते. हा रस्ता पूर्णपणे धोकादायक झाला असून वाहनांच्या वापरा करता योग्य राहिला नाही असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. संपूर्ण रस्ता खणून न काढता जुनं डांबर, दगड, माती, रस्त्यावर टाकली जात आहे. रस्त्यावर केवळ पॅच रिपेअरींग करण्यात येत असून बेकायदेशीररित्या या रस्त्याची उंची वाढत चालली असून किनारपट्टीवर असलेली घरे व इमारतींची उंची कमी होत चालली आहे. असंही नमूद करण्यात आलं आहे. रस्त्याची उंची कमी करून, रस्ते खणून काशीहून नवीन रस्ते तयार करावेत, गटार ड्रेनेज लाईन दुरुस्त करून घ्यावे, दगड, माती काढून घेऊन रस्ते पाण्याने साफ करून घ्यावेत असही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अन्यथा कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल असा इशाराही उजैर नजे यांनी दिला आहे.
या रस्त्याच खड्डेभरणीच काम सुरू आहे. सध्या रस्ता चालू ठेवणं गरजेच आहे. लोकांसाठी ते सोयीचं आहे. खडी टाकून खड्डे बुजवले जात आहे. पावसात डांबरीकरण शक्य नसल्यानं खडी टाकूनच रस्ता सुरु ठेवू शकतो. या रस्त्याला भविष्यात एमएमआरडीए अंतर्गत निधी मंजूर झाला आहे. हा काँक्रीट रस्ता बांधताना संपूर्ण रस्ता खणून काढला जाईल, रस्त्याची योग्य लेव्हल केली जाईल, आजूबाजूच्या घरांचा विचार केला जाईल तसेच ड्रेनेज गटारांची दुरुस्ती केली जाईल असे केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितलं. आता निधी केव्हा मंजूर होतो ते देखील पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.