धाडस दाखवून पोलिस कर्मचाऱ्याने वाचविले महिलेचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 08:10 AM2024-07-08T08:10:23+5:302024-07-08T08:10:35+5:30
जीव वाचवणाऱ्यांचे महिलेच्या कुटुंबीयांनी आभार मानले
कल्याण : उल्हास नदीवर फुले टाकण्यासाठी आलेली महिला दिसत नसल्याचे कानी पडताच एका पोलिस कर्मचाऱ्याने ट्रॅफिक वाॅर्डनसोबत नदीत उडी मारली आणि तिला बाहेर काढले आणि वेळीच तिच्या पोटातील पाणी काढले. हे धाडस दाखवणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी मच्छिंद्र चव्हाण, वाॅर्डन संजय जायस्वार यांचे महिलेच्या कुटुंबीयांनी आभार मानले.
पश्चिमेतील गांधारी परिसरातील इमारतीत राहणाऱ्या सुनंदा बोरसे (७२) फुले टाकण्यासाठी उल्हास नदीजवळ गेल्या. ही महिला दिसत नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने गांधारी पुलाजवळ वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस चव्हाण यांना दिली. माहिती मिळताच चव्हाण व वाॅर्डन जायस्वार यांनी नदीकिनारा गाठला. तेथे पिवळ्या रंगाची साडी त्यांना दिसली.
त्यानुसार अंदाज घेत चव्हाण यांनी सुनंदा यांचा हात पकडून त्यांना पाण्याबाहेर काढले. गाळात अडकल्याने ती प्रवाहात वाहून गेली नाही. बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्वरित तिच्या पोटातील पाणी बाहेर काढले आणि तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले.