स्वातंत्र्य दिनाची सुट्टी म्हणून कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाने ओपीडीलाही सुट्टी
By मुरलीधर भवार | Published: August 16, 2023 10:57 AM2023-08-16T10:57:52+5:302023-08-16T10:58:25+5:30
ओपीडी स्वातंत्र्य दिनाच्या सुटीनिमित्त बंद असल्याने, ओपीडीत उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले.
मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क. कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील रुग्णालयावर जास्त ताण आहे. या रुग्णालयातील ओपीडीचा लाभ दररोज ९०० ते १,२०० जण घेतात. मात्र, आज रुग्णालयातील ओपीडी स्वातंत्र्य दिनाच्या सुटीनिमित्त बंद असल्याने, ओपीडीत उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागले.
स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन आटोपून मुख्य वैद्यकीय अधिकारी घरी गेले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्यात आला होता की, स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या सुटीमुळे ओपीडी बंद राहील. उद्या (ता. १६) ओपीडी सुरू राहील. मात्र, मंगळवारी ओपीडी बंद राहील, याची कोणाला माहिती नसल्याने रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यांना पुन्हा माघारी जावे लागले.
रुग्णालयाने अपघात विभागात इमर्जन्सी ओपीडी सुरू ठेवली होती. केसपेपर खिडकीच बंद असल्याने काही रुग्ण बंद खिडकी पाहून मागच्या पावली घराकडे परतले. ज्यांनी आत जाऊन चौकशी केली, त्यांना केवळ इमर्जन्सी ओपीडीत उपचार मिळाले. इमर्जन्सी ओपीडीतही ९ ते १२ वाजेच्या दरम्यान केवळ ४० रुग्णांनी उपचार घेतले. दररोज ९०० ते १,२०० जण रुग्णालयाच्या ओपीडीचा लाभ घेतात. ही आकडेवारी पाहता, शेकडो रुग्णांना विनाउपचार परतावे लागले.
अद्ययावत आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न, पण...
महापालिकेने १ जूनला आयसीयू कक्ष सुरू केला होता. त्यात १० बेडची सुविधा होती. मात्र, दोनच दिवसांत हा कक्ष बंद करण्यात आला. खासगी एजन्सीला चालविण्यास दिल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी असमर्थता दर्शविली. हा कक्ष बंद होऊन अडीच महिने उलटून गेले, तरी महापालिकेने कक्ष सुरू करण्याकरिता दुसरी एजन्सी नेमलेली नाही. रुग्णालयात आयसीयूची व्यवस्था नसल्याने रुग्णांना कळवा किंवा मुंबईतील सरकारी रुग्णालयात पाठविले जाते.
आयसीयू नसल्याने काय झाले?
आधारवाडी येथे राहणारे निनाद लोकूर (५४) हे खासगी कंपनीत कामाला होते. त्यांना ताप आल्याने त्यांनी घरीच उपचार केले. जास्त त्रास झाल्यावर त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसीयू कक्ष नसल्याने कळवा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना अवघ्या ३ तासांतच त्यांचा १३ ऑगस्टला मृत्यू झाला.