कल्याण : हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस. एम. शेट्टी स्कूलला विजेतेपद
By मुरलीधर भवार | Published: January 23, 2024 03:08 PM2024-01-23T15:08:56+5:302024-01-23T15:09:36+5:30
एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलने कल्याणच्या सेंट लॉरेन्स स्कूलचा ३-२असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.
कल्याण- स्पोर्ट्स केअर फाउंडेशन आयोजित स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ चौथ्या कल्याण क्रीडा महोत्सवात झालेल्या शालेय हँडबॉल स्पर्धेत पवईच्या एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलने कल्याणच्या सेंट लॉरेन्स स्कूलचा ३-२असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.
व्हॉलीबॉल स्पर्धेत तालुका क्रीडा संकुल बदलापूर विजेते तर चंद्रेश लोढा स्कूलने उपविजेतेपदाला गवसणी घातली तर मुलींच्या गटात रोजरी हायस्कूल बदलापूर विजेते ठरली. मल्लखांब स्पर्धेमध्ये कसाऱ्याच्या अतुल्य क्लब ने विजेतेपद तर डोंबिवलीच्या भरारी क्लबने उपविजेतेपद पटकावले. डॉचबॉल स्पर्धेमध्ये डोंबिवलीच्या श्रीचैतन्य टेक्नो शाळेने विजेतेपद तर कल्याणच्या सेंट लॉरेन्स शाळेने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. व्हॉलीबॉल - मलखांब स्पर्धा भाल गुरुकुल स्कूल येथे तर हँडबॉल - डॉजबॉल स्पर्धा होली फेथ स्कूल येथे संपन्न झाल्या. या सर्व स्पर्धेमध्ये ४७० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
ही स्पर्धा ८,१०, १२, १४ आणि १६ या वयोगटात खेळवण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी नगरसेविका आणि भाजपा महिला आघाडी अध्यशा रेखा चौधरी, भाल गुरुकुल शाळेचे संचालक नीलकंठ मुंडे, होली फेथ शाळेचे संचालक देव पालीवाल हे उपस्थित होते तर स्पर्धेत पंच म्हणून आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष गायकवाड, अशोक शिंदे, सुनील गडगे, अजीत देशमुख, शिवानी सावंत, चेतना काकुळते, कोमल केसुरे, अनिकेत पाटील, रेखा जाधव, शलाका दातार, पवन आडवळे, कोमल कामडी, रमेश वाजे, योगेश जाधव, रमेश कदम यांनी मेहनत घेतली.