कल्याणच्या सह्याद्री राॅक अॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा
By मुरलीधर भवार | Published: January 2, 2023 04:12 PM2023-01-02T16:12:28+5:302023-01-02T16:17:27+5:30
पुणे शहरापासून कामशेत-जाम्बवली मार्गे अंदाजे ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर, निबिड आणि घनदाट जंगलात 'रांगडा ढाकचा बहिरी' वर्षा नु वर्षे दिमाखात उभा आहे.
कल्याण- कल्याणच्या सह्याद्री राॅक अॅडव्हेंचर ग्रुपच्या गिर्याराेहकांनी आव्हानात्मक असलेला कळकरायचा सुळका नुकताच सर केला आहे. हा सूळका सर केल्यावर गिर्याराेहकांनी त्याठिकाणी तिरंगा फडकवून चढाईचा आनंद व्यक्त केला.
पुणे शहरापासून कामशेत-जाम्बवली मार्गे अंदाजे ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर, निबिड आणि घनदाट जंगलात 'रांगडा ढाकचा बहिरी' वर्षा नु वर्षे दिमाखात उभा आहे. बहिरीची गुहा त्याच्या आव्हानात्मक चढाईमुळे आजकाल बऱ्याच प्रकाश झाेतात आलेली आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूलाच सुमारे २०० फूट उंचीचा सरळ रेषेत उभा असलेला कळकराय सुळका.मनाची आणि भीतीची परीक्षा घेणारा हा सुळका.
नुकताच कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने हा उभा २०० फुटी सुळका केवळ 30 मिनिटात सर करून शहराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. कामशेत येथील जांभवली येथून सुमारे दीड तास जंगल भटकंती आणि गिर्यारोहण करून कळकराय च्या पायथ्याशी पोहचल्यानंतर संघाच्या वतीने सुळक्याचे पूजन करून आपल्या गिर्यारोहण साहित्य सोबत घेऊन संघाच्या वतीने एका पाठी एक अशा पद्धतीने सुळखा सर करायला घेत केवळ ३० मिनिटात पार करण्याची किमया संघाच्या वतीने करण्यात आली.
या आधी ही सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी संघाद्वारे वाशिंद येथील वजीर,जुन्नर चा वाणरलिंगी,पहिने चे नवरा नवरी सुळके सर करून शहराचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात मोठे केले आहे.
या मोहिमेत संघाच्या वतीने पवन घुगे,दर्शन देशमुख, रणजित भोसले,भूषण पवार,सुनील कणसे,संजय कारे लतीकेश कदम आणि शिवानी शिंदे ह्यांनी सहभाग घेतला होता.
२०२० पासून क्लाइंबिंग हा प्रकार ऑलिंपिक मध्ये सहभागी झाल्या पासून ह्या खेळात अनेकांचा रस वाढत आहे,त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातून जास्तीत जास्त गिर्यारोहक ह्या खेळाला जोडून देशासाठी योगदान देण्यासाठी खेळाडू तयार करायचा उद्देश सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचा आहे असे संघाच्या भूषण पवार ह्यांनी सांगितले.