धक्कादायक! भर रस्त्यात एसटी बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब, प्रवाशांच्या जिवीताशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 02:17 PM2021-02-16T14:17:18+5:302021-02-16T14:18:33+5:30
ST Bus Wheel Nut Bolt Missing: कल्याण-भर रस्त्यात चालणाऱ्या एसटी बसमधून आवाज आल्याने बस थांबवून पाहिले. तेव्हा बसच्या एका चाकाचे नटबोल्ट नव्हते.
कल्याण-भर रस्त्यात चालणाऱ्या एसटी बसमधून आवाज आल्याने बस थांबवून पाहिले. तेव्हा बसच्या एका चाकाचे नटबोल्ट नव्हते. (ST Bus Wheel Nut Bolt Missing) हा प्रकार वेळीच माहिती पडल्याने मोठा अपघात टळला. हा प्रकार घडल्याने बसेसची देखभाल दुरुस्ती योग्य प्रकार न करताच बसेस रस्त्यावर चालविल्या जातात ही बाब समोर आली आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर जाणारी बस थांबली असता जागरुक नागरीक योगेश दळवी यांची नजर बसवर पडली. त्यांनी चालक वाहकाकडे विचारणा केली. बसच्या एका चाकाचे नटबोल्ट गायब होते. हा प्रकार लक्षात येताच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. बस दुरुस्तीसाठी कल्याण बस डेपोशी संपर्क साधण्यात आला. योगेश दळवी यांनी बसचा व्हीडीओ काढला आहे. बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब कसे काय झाले. बस डेपोतून संचलनासाठी बाहेर काढता त्याची चाचणी केली गेली नव्हती का असा सवाल दळवी यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात बस डेपो प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ही बस पनवेल डेपोची आहे. कल्याण मुरुड मार्गावर ही बस चालते. सध्या ही बस कल्याण डेपोत आणली असून तिच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.