कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार; श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानांना यश

By मुरलीधर भवार | Published: January 3, 2023 06:26 PM2023-01-03T18:26:13+5:302023-01-03T18:26:35+5:30

कल्याण-तळोजा मेट्रो १२ बांधकामासाठी एमएमआरडीएकडून ११.२८ कोटींची निविदा जाहीर

Kalyan Taloja to hire consultants for metro stations; Success to MP Srikant Shinde's efforts | कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार; श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानांना यश

कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार; श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानांना यश

Next

कल्याण- ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी आता वेगाने हालचाली सुरू आहेत. या मेट्रो मार्गाच्या कामातील महत्वाचे टप्पे असलेल्या स्थानक, डेपो उभारणीच्या कामासाठी सखोल आरेखन सल्लागाराच्या नेमणुकीसाठी आता एमएमआरडीएने निविदा जाहीर केल्या आहेत. या मेट्रो १२ मार्गिकेला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली आहे. 

या मार्गामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य उपनगरे थेट कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि नवी मुंबईशी जोडली जाणार आहेत. यासाठी एमएमआरडीएकडून ११ कोटी २८ लाख रुपयांची निविदा नुकतीच जाहीर करण्यात आली. तर प्रत्यक्ष कामाची निविदा येत्या सात दिवसात जाहीर केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईसह ठाणे आणि ठाण्याच्या पल्याड कल्याण- डोंबिवली शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केले जात आहे. ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली, कल्याण तालुक्यातील काही गावे आणि पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. हा मेट्रो मार्ग २० किलोमीटरचा असून यात १७ स्थानके आहेत.

या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुबंई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी  खासदार  शिंदे सुरुवातीपासूनच आग्रही आहेत. काही महिन्यांपूर्वी  खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना पत्र लिहून या मार्गिकेच्या कामाला गती देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर एमएमआरडीए मुख्यालयात झालेल्या बैठकीत या मार्गाचे सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन महानगर आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार या मार्गाचे जलद गतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

सद्यस्थितीला कल्याण- तळोजा मेट्रो १२ या मार्गिकेवरील १७ स्थानके, मेट्रो डेपो आणि इतर बांधकामासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी एमएमआरडीएकडून ११ कोटी २८ लाख रुपयांची निविदा नुकतीच जाहीर केली आहे. तर सात दिवसांनंतर मेट्रो १२ च्या प्रत्यक्ष कामाची निविदा जाहीर केली जाणार असून ती साधारणतः सहा हजार कोटींची असेल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मेट्रो १२ मार्गिकेला गती मिळाली आहे. या मेट्रो मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होणार असून कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Kalyan Taloja to hire consultants for metro stations; Success to MP Srikant Shinde's efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.