कल्याणचा स्कायवॉक झालाय चोर, गर्दुल्ल्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:09 AM2020-12-17T00:09:49+5:302020-12-17T00:09:58+5:30
नागरिकांची सुरक्षा धोक्यात : प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले, ठोस कारवाईची गरज
n लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : गर्दुल्ले आणि लुटारू यांच्यामुळे स्कायवॉकवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. गर्दुल्ल्यांकडून तरुणीची छेड काढल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील मोबाइल खेचून लुटारूंनी पलायन केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांनी येथील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या गंभीर घटनांनंतर तरी प्रशासन जागे होईल का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडीतून सुटका करण्याच्या अनुषंगाने २०१०/११ मध्ये पश्चिमेकडील भागात स्कायवॉकची उभारणी केली गेली. एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधलेल्या स्कायवॉकची जबाबदारी सद्यस्थितीला केडीएमसीकडे आहे. स्कायवॉक रेल्वेच्या पुलाला जोडून असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा वापर करतात. या स्कायवॉकमुळे फेरीवाल्यांचा त्रास वाचेल, तसेच वाहतूककोंडीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती, परंतु फेरीवाल्यांनीच स्कायवॉकवर ठाण मांडल्याने ही अपेक्षा फोल ठरली आहे. फेरीवाल्यांच्या कचऱ्यामुळे या ठिकाणी आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबरच भिकारी, गर्दुल्ल्यांचा उपद्रव कायम राहिल्याने पहाटे अथवा रात्री उशिरा या स्कायवॉकवरून प्रवासी अथवा नागरिकाला जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागते. फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ले यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने एक प्रकारे बकाल स्वरूप या स्कायवॉकला आले आहे. त्यात मंगळवारी स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणीचा गर्दुल्ल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या तरुणीसह तिच्या मैत्रिणींनी आणि नागरिकांनी त्याला बेदम चोप दिल्याची घटना घडली. छेडछाडीचा हा प्रकार घडून २४ तासही उलटत नाहीत, तोच स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल चोरून त्याला मारहाण केल्याचा प्रकार रात्री दहाच्या सुमारास घडला. नीलेश इंगळे असे या तरुणाचे नाव असून, तो पश्चिमेकडून पूर्वेला जात होता. मोबाइलवर बोलत असताना अचानक दोघे जण आले आणि मारहाण करत, त्याचा मोबाइल हिसकावून पळून गेले. यात नीलेशच्या मानेला दुखापतही झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरक्षारक्षक नेमण्याची गरज
वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे स्कायवॉकचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. स्कायवॉकवर सुरक्षारक्षक नेमण्याबाबत वारंवार मागणी होत आहे. आता तरी ठोस कृती होईल का, याकडे लक्ष लागले आहे.