ह्याला म्हणतात गरुडझेप... जगातल्या धनाढ्य उद्योगपतीसाठी कल्याणची मराठमोळी लेक बनवणार स्पेस रॉकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:11 AM2021-07-15T06:11:13+5:302021-07-15T06:12:18+5:30
'न्यू शेफर्ड'च्या टीममध्ये समावेश.
कल्याण : जगप्रसिद्ध ब्रँड ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजीन ही अमेरिकन स्पेस कंपनी अंतराळ सफरीचा नवा इतिहास घडविणार आहे. २० जुलैला काही निवडक पर्यटकांना घेऊन ही कंपनी आकाशात झेपावणार आहे. या पर्यटकांमध्ये कल्याणची संजल गावंडे आहे.
कोळसेवाडीत राहाणा-या संजलची आई सुरेखा एमटीएनएलमध्ये कामाला आहे, तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीचे निवृत्त कर्मचारी आहेत. संजलने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने शिक्षणाच्या जोरावर अमेरिकेतील मिशिगन टेक विद्यापीठात प्रवेश मिळविला. तेथे तिने मास्टर्स पदवी मिळवली आहे. मरक्युरी मरीन कंपनीत तिला मनासारखी नोकरी मिळाल्याने तिचे लक्ष अवकाशाकडे लागले आहे.
नोकरी करीत असताने तिने विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ती टोयटा रेसिंग डेव्हलपमेंट कंपनीत कामाला लागली. तिने नासामध्येही अर्ज केला होता. तेथे तिची निवड झाली नाही. मात्र, ब्लू ओरिजीन कंपनीत तिची निवड झाली. अंतराळ तंत्रज्ञानात न्यू शेफर्डचे लॉचिंग हा एक मैलाचा दगड समजला जातो. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या १० जणांत संजल आहे.
काय आहे न्यू शेफर्ड?
आतापर्यंत अंतराळात केवळ उपग्रह किंवा त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी यान सोडले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत स्पेस टुरिझम अर्थातच अंतराळ सफर नावाची नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्यासाठी ब्ल्यू ओरिजीन कंपनी काम करत असून, अंतराळ पर्यटकांसाठी त्यांचे न्यू शेफर्ड यान २० जुलैला अंतराळात झेपावणार आहे. यात अमेझॉन संस्थापक जेफ बेझोससह त्यांचा भाऊ आणि काही पर्यटक असणार आहेत. विशेष म्हणजे या यानातून प्रवास करण्यासाठीची किंमत तब्बल २८ मिलियन डॉलर (सुमारे २०८ कोटी ७८ लाख ३४ हजार रुपये) इतकी आहे.
हे यान अवकाशात आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अंतराळ सीमेपर्यंतचा अवघ्या ११ मिनिटांचा प्रवास करून पुन्हा पृथ्वीवर उतर. त्यामुळेच न्यू शेफर्डच्या लाँचिंगचा आंतरराष्ट्रीय अंतराळ क्षेत्रासह जागतिक पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने जगाच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला जाणार आहे.