स्मशानभूमीच्या समस्येवरून केडीएमसी प्रशासन घेणार महत्वपूर्ण निर्णय - आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 PM2021-04-22T16:25:02+5:302021-04-22T16:38:01+5:30
Kalyan- Dombivli: स्मशानभूमीत 24 तास कर्मचारी तैनात करण्यात येणार असून सर्व स्मशानभूमीमध्ये लाकडं पुरविण्याची सोय देखील करण्यात येणार आहे.
- मयुरी चव्हाण
कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहेे.
स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी अनेक मृतदेह वेटींग वर असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. याबाबत सोशल मीडियावरदेखील नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानभूमीच्या समस्येकडे "लोकमत" ने विशेष लक्ष वेधले होते. येणाऱ्या काळात या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पालिका प्रशासन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी "लोकमतला" दिली आहे.
स्मशानभूमीत 24 तास कर्मचारी तैनात करण्यात येणार असून सर्व स्मशानभूमीमध्ये लाकडं पुरविण्याची सोय देखील करण्यात येणार आहे. तसेच गॅस शवदाहिनीची संख्या वाढविण्याचा देखील प्रयत्न प्रशासन करणार आहेत. काही स्मशानभूमीमधील स्टँड हे दुरुस्त केले जाणार असून त्या ठिकाणीही अंत्यसंस्कार करता येणार असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.
या सर्व निर्णयांवर चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अंत्यसंस्कारासाठी निर्माण होणाऱ्या समस्या काही प्रमाणात मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.