‘केडीएमसी निवडणुकीला विशेष संपर्क मंत्री नेमावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:22 AM2021-01-11T00:22:57+5:302021-01-11T00:23:25+5:30
राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार जगन्नाथ शिंदे तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. वंडार पाटील यांच्याकडे सोपविली आहे
कल्याण : राष्ट्रवादीची स्थिती कल्याण-डोंबिवलीत नाजूक असल्याने परिवर्तन होणे आवश्यक आहे. केडीएमसीची निवडणूक पाहता पक्षाला उभारी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यासाठी विशेष संपर्कमंत्री नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली.
राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार जगन्नाथ शिंदे तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. वंडार पाटील यांच्याकडे सोपविली आहे. या दोघांकडून स्थानिक स्तरावर बैठकांचे सत्र सुरू आहे. तरुण, सक्षम कार्यकर्त्यांना नव्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. पक्ष बांधणी व वाढविण्याचे काम सुरू असताना जिल्ह्यासाठी विशेष संपर्कमंत्री नेमण्याची मागणी माजी प्रदेश सचिव साळवे यांनी केली. राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त स्वत:चा मतदारसंघ आणि कुटुंबीयांपुरतेच मर्यादित विचार करता येतो, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असल्याचे साळवे यांनी पत्रात नमूद केले आहे.
एकूणच चित्र पाहता पक्षाच्या वरिष्ठांनी ठाणे जिल्हा आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षाला भेट दिला आहे का? असाही सवाल साळवे यांनी केला आहे.