केडीएमसी ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्काराने सन्मानित

By प्रशांत माने | Published: February 16, 2024 08:08 PM2024-02-16T20:08:39+5:302024-02-16T20:08:58+5:30

सौरऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत गौरव

KDMC Awarded Green Energy and Energy Conservation Award | केडीएमसी ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्काराने सन्मानित

केडीएमसी ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्काराने सन्मानित

प्रशांत माने/कल्याणदेश स्तरावर सौर उर्जा क्षेत्रात व महापालिकेच्या विविध विभागात उर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबाबत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने ४ था ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्काराने केडीएमसीला गौरविले आहे. नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटाट सेंटर येथे झालेल्या १२ व्या ग्रीन एनर्जी संमेलनामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. मनपाच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला.

२००७ पासून केडीएमसीने परिक्षेत्रातील नविन इमारतीवर सौर ऊर्जा संयत्रे बसविणे विकासकांना बंधनकारक केले आहे. त्यासाठी मनपाच्या विद्युत विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. २००७ ते २०२१ या कालावधीत एकूण १८३२ इमारतीवर १ कोटी ८ लक्ष लीटर्स प्रतीदिन क्षमतेचे सौर उष्ण जल संयंत्रे विकासकाकडून बसविण्यात आली आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये गिझरचा वापर न होता प्रतीवर्ष १८ कोटी वीज युनिटची बचत होत आहे. २०२१ पासून मनपाने विकासकांना रुफ टॉप नेट मीटर सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प बंधनकारक केले आहे. आजपर्यंत ११९ इमारतीवर २०८३ किलो वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकाकडून करुन घेतल्याने प्रती वर्ष ३० लक्ष वीज युनिट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे. मनपाने आधारवाडी येथील नविन प्रशासकीय इमारतीवर देखील २५ किलो वॅट क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तर प्रभागक्षेत्र कार्यालय व आयुक्त निवास स्थान अशा १० इमारतींवर १६० किलो वॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प फेब्रुवारी अखेरीस कार्यान्वित होणार आहे.


महापालिकेने शहरात उर्जा बचत करणारे एल.ई.डी पथदिवे बसविले आहेत. दोन्ही नाटयगृहात ऊर्जा बचत करणारे चिलर व महापालिका कार्यालयामध्ये उर्जा बचत करणारे सिलींग फॅन व एल.ई.डी लाईटस बसविले आहेत. उंबर्डे, आयरे, कचोरे येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित केले असून कच-या पासून वीज निर्मिती होत आहे. आधारवाडी येथे बायोमास प्रकल्प कार्यान्वित केला असून स्लॉटर हाऊस मधील वेस्ट पासून वीज निर्मिती होत आहे. दरम्यान या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Web Title: KDMC Awarded Green Energy and Energy Conservation Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.