‘केडीएमसी’चा करदरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर; ३१८२.५३ कोटींची तरतूद, पर्यावरण संवर्धनासह सुविधा देण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 07:13 AM2024-02-28T07:13:17+5:302024-02-28T07:13:30+5:30
विकासकामांना व पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच समाजातील दिव्यांग, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देण्याचा मानस यात व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : करवाढ नसलेला ‘केडीएमसी’चा २०२४-२५ चा ३१८२.५३ कोटी जमा व ३१८२.२८ कोटी खर्च असा २५ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी सादर केला. विकासकामांना व पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच समाजातील दिव्यांग, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देण्याचा मानस यात व्यक्त केला आहे.
दिव्यांगांसाठी मासिक पेन्शन व विविध उपक्रम, पालिका शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्यांना नीट, जेईई, एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कला, क्रीडा इत्यादी गुणांना वाव देण्याकरिता तज्ज्ञांच्या मार्गदर्शन संस्था नेमण्यात येणार आहेत.
ई-बसेसना विशेष प्राधान्य
परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प देखील महाव्यवस्थापक दीपक सावंत यांनी सादर केला. यात पीएम ई-बससेवा, एकत्रित परिवहन प्राधिकरण मंडळ, ई-बस यांना विशेष प्राधान्य दिले गेले असून, आगारांचा विकासाच्या दृष्टीनेही कार्यवाही प्रस्तावित केली आहे. आयुक्त जाखड यांनी स्वत:च्या अधिकारात या दोन्ही अर्थसंकल्पांना मंजुरी दिली असून अर्थसंकल्पातील तरतुदी आता प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधांसह ५० सन्मान कट्टे उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे.
तृतीयपंथी नागरिकांसाठी विविध योजना प्रस्तावित असून, यासाठी देखील ५० लाखांची तरतूद केली आहे.
वृक्षतोडीला आळा बसण्यासाठी, तसेच हवेतील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरातील लाकडांवर चालणाऱ्या स्मशानभूमीचे टप्प्याटप्प्याने ‘विद्युत दाहिनी’त रूपांतर होणार आहे.
शहरात अनेक ठिकाणी मियावॉकी पद्धतीने हरित क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे.
तलावांचे संवर्धन, सौरऊर्जा निर्मिती, शहर सौदर्यीकरण, खेळांची मैदाने विकसित करण्यावर भर दिला गेला आहे.