रेरा प्रकरणातील बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा
By मुरलीधर भवार | Published: January 4, 2023 06:22 PM2023-01-04T18:22:00+5:302023-01-04T18:22:44+5:30
महापालिकेचे प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही करावाई करण्यात आली आहे.
कल्याण - रेरा आणि कल्याण डाेंबिवली महापालिकेची फसवणूक केलेल्या बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने आज हाताेडा चालविला आहे. बोगस बांधकाम परवानगी प्रकरणातील डाेंिवली पश्चिमेतील रेतीबंदर क्राॅसराेड येथील रहिवास नसलेली तळ अधिक सात मजली बेकायदा इमारत पाडण्याची धडक कारवाई सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी आजपासून सुरु केली आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही करावाई करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रानुसार लक्ष्मीबाई सोनू पवार यांचे कु.मु.धा. ओम साई डेव्हलपर्सतर्फे मयूर किशोर वारकेकर यांनी सदर इमारत बांधलेली आहे. महापालिका कर्मचारी पथकाने पाेलिस बंदाेबस्तात ही कारवाई केली. जेसीबी, पाेकलेन, क्राॅन्क्रीट ब्रेकरच्या सहाय्याने ही कारवाई केली गेली.
महापालिका हद्दीत काही बिल्डर आणि वास्तूविशारद यांनी मिळून महापालिकेची खाेटी बांधकाम परवानगी मिळविली. त्यासाठी खाेट्या सही शिक्क्याचा वापर केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. रेरासह महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी ६५ बिल्डरांच्या विराेधात पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एसआयटी आणि ईडीकडून चाैकशी सुरु आहे. त्याचबराेबर उच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे. या बेकायदा बांधकामाचा शाेध घेण्यासाठी महापालिकेने सर्व्हेअरनेमले आहेत. त्यांनी त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पुढील कारवाई सुरु आहे.
ज्या बेकायदा इमारती नागरीक राहत नाही. त्याच इमारतीवर प्रथम कारवाई केली जाईल. ज्याइमारतीत नागरीक राहतात. मात्र त्यांची फसवणूक झाली आहे. त्या इमारतीवर कारवाई करण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. आज कारवाई केलेल्या इमारतीत नागरीक राहत नव्हते. महापालिकेने यापूर्वी ११ बेकायदा इमारतीवर कारवाईचा हाताेडा चालविला हाेता. आजच्या कारवाई पश्चात ही संख्या १२ वर पाेहचली आहे.