केडीएमसीने तोडली ८ बेकायदा भंगार गोदामे; १५ गोदाम चालकांच्या विरोधात एमआरटीपीचे गुन्हे दाखल
By मुरलीधर भवार | Published: April 4, 2024 06:44 PM2024-04-04T18:44:12+5:302024-04-04T18:44:26+5:30
कल्याण-२७ गावातील सोनारपाडा आणि माणगाव परिसरातील ८ बेकायदा भंगार गोदामे तोडण्याची कारवाई आज करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भंगार ...
कल्याण-२७ गावातील सोनारपाडा आणि माणगाव परिसरातील ८ बेकायदा भंगार गोदामे तोडण्याची कारवाई आज करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भंगार गोदाम चालकाचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी केली आहे.
बेकायदा भंगार गोदामांमध्ये ई वेस्टचे साहित्य गोळा करुन ठेवले जाते. तसेच काही रासायनिक कंपन्यातून वापरात नसलेले रासायनिक ड्रमही साठवून ठेवले जातात.
त्या ड्रममध्ये रासायनिक पदार्थ काही अंशी असतो. या भंगार गोदामाच्या नजीक नागरी वस्ती आहे. या नागरी वस्तीला भंगार गोदामामुळे धोका होऊ शकतो. तसेच या भंगार गोदामातून रासायनि ड्रम धूतले जातात. त्यामुळे नाल्यात रासायनिक पाण्यामुळे प्रदूषण होते. काही वर्षापूर्वी गोलवली नजीक एका भंगार गोदामात झालेल्या भीषण स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. महापालिकेने केलेली कारवाई स्तूत्य आहे. त्यात सातत्य हवे अशी आपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे. सहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यात १५ बेकायदा भंगार गोदाम चालकाच्या विरोधात एमआरटीपी अ’क्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे.
दरम्यान काही भंगार गोदाम मालकांनी त्यांचे बस्तान उंबार्ली टेकडीनजीक हलविले आहे. काही ग्रामस्थ आणि भूमीपूत्र मंडळीकडून या भंगार गोदामाला गाळे भाड्याने दिले जातात. त्यांना या भंगार गोदामाकडून गलेलठ्ठ भाडे मिळत असल्याने त्यांच्याकडून गाळे दिले जातात. असे गाळे उंबार्ली टेकडीनजीक वसले आहे. उंबार्ली टेकडीनजीक वनराई आहे. त्याठिकाणी वनराईचा प्रकल्प राबविला जाणार आहे. या वनराई प्रकल्पास बेकायदा भंगार गोदामामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या टेकडीव हजारो लोक सकाळ संध्याकाळ फेरफटका मारुन व्यायामासाठी येतात. या ठिकाणीही अशीच धडक कारवाई केली जावी अशी मागणी फेरफटका मारण्यासठी येणाऱ््या नागरीकांकडून केली जात आहे.