केडीएमसी निवडणूक : युती, आघाडीच्या चर्चांनी संभ्रम; कोणता प्रभाग येणार कोणाच्या वाट्याला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 07:46 AM2020-12-21T07:46:29+5:302020-12-21T07:46:49+5:30
KDMC elections: केडीएमसी निवडणुका २०१५च्या प्रभागरचनेनुसार होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत प्रक्रिया जानेवारीत होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
कल्याण : आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असे स्पष्टीकरण आघाडीच्या नेत्यांकडून दिले जात असताना, दुसरीकडे केडीएमसीच्या निवडणुकीत मनसे-भाजप युतीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आघाडी आणि युतीच्या चर्चांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आघाडी आणि युती झाली, तर आपल्या पक्षाच्या वाट्याला कोणता प्रभाग येईल, ही चिंता त्यांना सतावत आहे.
केडीएमसी निवडणुका २०१५च्या प्रभागरचनेनुसार होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत प्रक्रिया जानेवारीत होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रभागाची रचना कायम राहिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. प्रभागात कोणते आरक्षण पडतेय, याची चिंता संबंधितांना लागली आहे. त्यात आता निवडणूक आघाडी आणि युतीतून लढण्याच्या चर्चांनी इच्छुकांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वच पक्षांतील हवशे, गवशे आणि नवशे समाजकार्याला लागल्याचे सोशल मीडियावर आजकाल मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पोस्टमधून दिसत आहेत.
बुडत्याला काडीचा आधार
२०१५च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे जेमतेम चार तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले. २०१०ची केडीएमसीची पहिली निवडणूक लढवणाऱ्या मनसेचे त्यावेळी २८ नगरसेवक निवडून आले हाेते, पण २०१५ मध्ये ही संख्या ९पर्यंत घसरली. येत्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे आणि भाजप युतीविषयी अद्याप चर्चाच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थानिक पातळीवरील दयनीय स्थिती पाहता, महाविकास आघाडीतून निवडणूक लढवताना शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी ‘बुडत्याला काडीचा आधार’ ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.