केडीएमसी आरोग्य विभाग सतर्क; उष्माघात कक्ष सज्ज

By सचिन सागरे | Published: April 6, 2024 07:18 PM2024-04-06T19:18:26+5:302024-04-06T19:18:38+5:30

हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे.

KDMC health department on alert Heat shock chamber ready | केडीएमसी आरोग्य विभाग सतर्क; उष्माघात कक्ष सज्ज

केडीएमसी आरोग्य विभाग सतर्क; उष्माघात कक्ष सज्ज

कल्याण : पुढील काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट झाली असून केडीएमसीने रुक्मिणीबाई रुग्णालयात आजपासून उष्माघात (हिट स्ट्रोक) कक्ष सज्ज ठेवला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने महापालिका सतर्क झाली आहे.

शहरात सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिकांच्या तब्येतीत बिघाड होत असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे, केडीएमसीच्या आरोग्य विभागामार्फत उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात उष्माघात कक्षात दोन खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षात एक डॉक्टर व एक नर्स असणार आहे. हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यानुसार केडीएमसीने ही खबरदारी घेतली आहे.   

 उष्मघाताची कारणे :

-भर उन्हाळ्यात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्मघात होईल, तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा सामना करावा लागेल. थायरॉईडची समस्या असेल तर उन्हात उष्माघात होण्याची शक्यता असते. थायरॉईड असंतुलनामुळे रक्तदाब बदलल्यास थकवा जाणवतो. जंकफूडमध्ये मोनोसोडियम, ग्लुटामेंटसह गरम आणि हानिकारक पदार्थ असतात. ज्यामुळे, शरीर उष्माघाताचा सामना करू शकत नाही.

--

*प्राथमिक लक्षणे काय?

-थकवा येणे, उच्च अथवा कमी रक्तदाब, चक्कर येणे, उलट्या होणे, स्नायूंमध्ये कडकपणा, सतत घाम येणे, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, श्वास घेण्यास समस्या, भीती व अस्वस्थ वाटणे.

 उष्‍णतेचा त्रास झाल्‍यास याचे करा पालन :

 उन्हात बाहेर जाणे टाळा, चहा, कॉफी व गरम पदार्थ टाळा, शरीरात तापमान सामान्य राखण्यासाठी पाण्याची कमतरता येऊ देऊ नये, दिवसातून २ ते ३ लिटर पाणी प्या, हलक्‍या रंगाचे, सैल कपडे घाला, अधिक प्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 अनेक वेळा तापमानात होणारे बदल किंवा बदलणारे ऋतू यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. उन्हाळा या ऋतूमध्ये तापमान अधिक वाढते. यामुळे, उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी, जास्तीत जास्त पाणी पिण्याबरोबरच डोक्यावर रुमाल अथवा टोपी वापरावी. थोडेही लक्षण जाणवले की, जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. – डॉ. ज्योती भांगरे, भूलतज्ञ, रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण.
 

Web Title: KDMC health department on alert Heat shock chamber ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.