बसेस भंगारात काढण्याचे नियम धाब्यावर बसविल्याने केडीएमसी वादाच्या भोवऱ्यात
By मुरलीधर भवार | Published: November 16, 2023 07:47 PM2023-11-16T19:47:25+5:302023-11-16T19:47:39+5:30
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नादुरुस्त बसेस भंगारात काढण्यासाठीचे सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नादुरुस्त बसेस भंगारात काढण्यासाठीचे सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तत्कालीन परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी नियम धाब्यावर बसविले. बसेस भंगारात काढण्याच्या प्रक्रियेत प्रक्रियेत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सहभाग असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे.
केडीएमसीच्या महासभेत नादुरुस्त बस स्क्रॅप करण्यासाठीचा ठराव परिवहन उपक्रमाकडून ११ फेब्रुवारी २०२० रोजी सादर करण्यात आला. या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. परिवहन उपक्रमाचे तत्कालीन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी बसेस भंगारात काढण्याचटे नियम धाब्यावर बसवुन महापालिकेस लागू असलेले नियम जोडून महासभेतील नगरसेवकांची दिशाभूल केली आहे. परिवहन उपक्रमातील बसेस मोडीत काढण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता.
सरकारी परिपत्रकात ट्रक किंवा बस किमान एक लाख किलोमीटर अथवा पंधरा वर्षे एवढा कालावधी उलटून गेला असल्यास बसेस मोडीत काढण्याचे धोरण आहे. परिवहन उपक्रमातील बसेस मोडीत काढण्यासंदर्भात जो ठराव मंजूर झाला. त्यातील बसेस दोन्ही निकषात बसत नसूनही १६ कोटी रक्कम स्वीकारण्याच्या अटीवर या बसेस मोडीत काढल्या जात आहेत.
बसेसचे लॉग बुक किलोमीटर किंवा कालावधी या दोन्ही निकषात या बसेस बसत नसतील तर या बसेस मोडीत काढण्याचा ठराव भ्रष्ट आणि गैरमार्गाने केला असल्याचा आरोप घाणेकर यांनी केला आहे.या प्रक्रियेत सहभागी असेलले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखळ करुन त्यांची चौकशी करावी असे निवेदन परिवहन व्यवस्थापकांना घाणेकर यांनी दिले आहे. यासंदर्भात केडीएमटीचे व्यवस्थापक दीपक सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घाणेकर यांचे निवेदन मला प्राप्त झाले आहे. त्यानुसार चौकशी करुन चौकशी अंती काही अनुचित आढळून आल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे.