५० चाळींना केडीएमसीची नोटीस, कचरा उघड्यावर टाकल्यास दंड वसूल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:52 PM2021-07-02T17:52:16+5:302021-07-02T17:55:19+5:30
कल्याण डोंबिवलीत राबवली जातेय शून्य कचरा मोहीम. कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारणार, पालिकेचा इशारा.
कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेकडून शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करुन घंडा गाडीकडे देत नाही. कचरा उघड्यावर टाकतात. कचरा उघडय़ावर टाकल्यास दंड आकारण्यात येईल असा इशारा महापलिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने ५० चाळींना कारवाईचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे.
महापालिकने मे २०२० शून्य कचरा मोहिम सुरु केली. ही मोहिम सुरु केली तेव्हा महापालिकेच्या घनकचरा विभागाने विविध ठिकाणच्या कचरा कुंड्या काढल्या. कचरा गाडीकडे जमा केला पाहिजे. तो कुंडीत टाकता कामा नये असा त्यामागचा उद्देश होता. अनेक बड्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प सोसायटी पातळीवर सुरु करा असे सांगितले. त्याचबरोबर कचरा वर्गीकरणासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवंलबिल्या. कपडे स्वरुपातील कचरा गोळा वेगळ्य़ा प्रकारे गोळा करुन वापरण्याजोग्या कपडय़ातून कापडी पिशव्या तयार केल्या. त्यातून महिला बचत गटांच्या हाताला काम मिळाले.
रबर, प्लास्टीक, काचा आदी वेगळे गोळा करण्याचे वार ठरवून दिले. प्लास्टीक कचरा वेगळ्य़ा पद्धतीने गोळा करुन तो रियकलींगला दिला. तसेच माणूसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरु केला. हे सगळे सुरु असताना अखेरीस आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याच्या उद्दीष्टापर्यंत महापालिका पोहचली. आत्ता महापालिकेने चाळीतील घरांमधून गोळा होणारा कचरा वर्गीकरण करुन येत नाही. तो उघडय़ावर टाकला जातो. तो उघडय़ावर टाकण्याऐवजी चाळीत राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या घरातील कचरा वर्गीकरण करुन तो घंडागाडीकडे जमा केला पाहिजे. घंडागाडी दोन वेळा चाळ परिसरात येणार आहे. गाडी येऊनही कचरा उघडय़ावर टाकल्यास कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास सुरुवातीला प्रत्येकी दंड आकारला जाईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आणि डोंबिवली पश्चिमेतील जवळपास ५० चाळींना नोटीसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे.
ग्रामीण भागात कचरा पडूनच
कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील कचरा उचलला जात नाही. तो ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून असतो. ग्रामीण भागात शून्य कचरा मोहिम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्याठिकाणी महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही अशी माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे.