KDMC News: कल्याणातही शिवसेना करणार भाजपावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक? केडीएमसीत मोठी उलथापालथ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:05 PM2021-11-26T17:05:17+5:302021-11-26T17:05:54+5:30
Shiv Sena News: भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत तीन नगरसेवक फोडत सेनेनं निवडणूकीपूर्वीच धमाका केला. आता कल्याण मधील सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
कल्याण - केंद्रात सत्तापालट झाल्यावर कल्याण डोंबिवली मध्येही त्याचे राजकीय पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केलाय. पण, राज्यात अचानक महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालं आणि पुन्हा राजकीय गणितं बदलायला सुरवात झाली. मोदी लाटेन भाजपाला तारलं . भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत तीन नगरसेवक फोडत सेनेनं निवडणूकीपूर्वीच धमाका केला. आता कल्याण मधील सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टप्प्याटप्याने सेना भाजपावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक करणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
भाजपामध्ये असलेले माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ सुनीता पाटील, सायली विचारे यांनी हातात शिवबंधन बांधले. मात्र यावर सेना थांबली नसून जिल्हा पातळीवरून अनेक हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. डोंबिवली नंतर आता कल्याणमध्ये भाजपाला धक्का देण्याचे प्रयत्न सेनेकडून केले जाणार आहेत.कल्याण पूर्वेतील काही नगरसेवकही सेनेत यायला इच्छुक असल्याच कल्याण पूर्वेचे सेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितलं आहे. याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना सांगितली असून लवकरच याबाबत निर्णय होईल असेही गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात अनेक उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे.