KDMC: कोविड काळात काम केलेल्या नर्स वॉर्डबॉयचे उपोषण, केडीएमसीच्या सेवेत घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:36 PM2022-06-29T13:36:36+5:302022-06-29T13:37:11+5:30
Kalyan Dombivali: कोविड काळात आरोग्य सेवा देणा:या नर्स आणि वॉर्डबॉय यांना पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य सेवेत समावून घेण्यात यावे यासाठी आज महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे.
कल्याण - कोविड काळात आरोग्य सेवा देणा:या नर्स आणि वॉर्डबॉय यांना पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य सेवेत समावून घेण्यात यावे यासाठी आज महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. मनोज भोगे, विक्रम कदम, अनिल धुळप, नितीन काकडे, राजू कदम यांच्या पुढाकाराने हे उपोषण सुरु करण्यात आले आहे. भर पावसात नर्स आणि वॉर्डबॉय हे उपोषणात सहभागी झाले होते.
महापालिकेची आरोग्य सेवा अपुरी असल्याने कोविडशी सामना करण्याकरीता कोविड काळापूरती नर्स, वॉर्डबॉय आणि अन्य आरोग्य स्टाफची भरती केली होती. ही भरती कोविड काळापूरती होती. महापालिका हद्दीत कोविडच्या पहिल्या आणि दुस:या लाटेच्या काळात या नर्स आणि वॉर्डबॉय यांनी काम केले. मात्र कोविडचा प्रादूर्भाव कमी होताच भरती करण्यात आलेल्या ४४७ पैकी २०१ जणांची सेवा खंडीत करण्यात आली. दरम्यान महापालिकेने आरोग्य खात्यात बाह्य संस्थेकडून भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आम्हाला सेवेतून काढून बाह्य संस्थेकडून सेवा भरती कशी काय केली जात आहे असा सवाल उपोषण करणा:यांनी उपस्थित केला आहे.
उपोषणकर्ते भोगे यांनी सांगितले की, बाह्य संस्थेकडून भरती करण्या ऐवजी कोविडच्या कठीण काळात आम्ही सेवा दिली. त्यामुळे आम्हाला सेवेत कायम ठेवा अशी मागणी करण्यात आली आहे. कोविड काळात आम्ही चांगली सेवा दिली. त्यामुळे महापालिकेस केंद्र सरकारकडून कोविड इन्व्होशन अॅवार्ड मिळाला. आम्हाची सेवा चांगली होती त्याची दखल घेत केंद्राने महापालिकेस पुरस्कार दिला. त्यामुळे महापालिकेचे कोविड काळातील चांगले कार्य देशपातळीवर पोहचले.
सेवेतून कमी करण्यात आलेल्या नर्स आणि वॉर्डबॉय यांनी औद्योगिक न्यायालयात आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या दोन्ही न्यायालयात त्यांनी सेवेत समावून घेण्याची मागणी करीत बाह्य संस्थेकडून केल्या जात असलेल्या भरती प्रक्रियेस विरोध केला आहे. उच्च न्यायालयाने सेवा खंडीत करण्यास ११ जुलैर्पयत स्थगिती आदेश दिला आहे.