धोकादायक इमारतीत केडीएमसीचे कार्यालय; पडझड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:28 AM2020-12-14T00:28:44+5:302020-12-14T00:29:00+5:30
पुनर्विकास हाेणार तरी केव्हा?
डाेंबिवली: केडीएमसीच्या डोंबिवली पूर्वेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय माजी आयुक्त गोविंद बोडके यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. महापालिकेच्या स्व-निधीतून हा विकास करणे अशक्य असल्याने, खासगीकरणातून हे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. आजतागायत कोणतीही कृती झालेली नाही. दुसरीकडे या जुन्या वास्तूत पडझड सुरूच असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर यंत्रणेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्षेत्र कार्यालयाची स्थापना होण्यापूर्वी या जागेवर अस्तित्वात असलेल्या इमारतीत तत्कालीन डोंबिवली नगरपालिकेचे व कालांतराने महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय म्हणून वापर होऊ लागला. प्रभाग क्षेत्रांची निर्मिती झाल्यानंतर डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्रासाठी याच कार्यालयाचा सध्या वापर होत आहे. ही वास्तू ४० वर्षे जुनी आहे. जागेचे महत्त्व व महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या अनुषंगाने संबंधित ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागक्षेत्र कार्यालये त्या-त्या प्रभागक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने ऑगस्ट, २०१९ मध्ये घेतला होता. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी.पी. चेंबर तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे हलविण्यात येणार होते.
स्वच्छतागृहाचीही दयनीय अवस्था
विभागीय कार्यालयाच्या वास्तूत पडझड होण्याचे प्रकार सुरूच आहेत. पहिल्या मजल्यावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या छताला असलेले पीओपी कोसळल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. ते अद्याप दुरुस्त केलेले नाही, तर एका उपअभियंत्याच्या कक्षातील पीओपीचा काही भाग कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. या विभागीय कार्यालयामधील स्वच्छतागृहही दयनीय अवस्थेत असून, गळक्या छपरांमुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित वास्तूचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्या संदर्भात व्हीजेटीआयला पत्रही बांधकाम विभागाने दिले आहे. यात इमारत अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट होताच, पुढील कार्यवाही केली जाईल. दरम्यान, ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पीपी चेंबरमध्ये हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. - राजेश सावंत, प्रभागक्षेत्र अधिकारी, ‘फ’ प्रभाग