केडीएमसीने ‘ती’ अग्निरोधक यंत्रे काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:46 AM2021-01-13T02:46:36+5:302021-01-13T02:46:53+5:30

२०१८ मध्ये लावले होते बाटले : भंडाऱ्यातील घटनेनंतर प्रशासन झाले जागे

KDMC removes 'she' fire extinguishers | केडीएमसीने ‘ती’ अग्निरोधक यंत्रे काढली

केडीएमसीने ‘ती’ अग्निरोधक यंत्रे काढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेची तपासणी (फायर ऑडिट) करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली मनपाने आपल्या दोन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिट केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मंगळवारी तब्बल वर्षभरानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयातील मुदतबाह्य अग्निरोधक यंत्रे काढून नेली आहेत. मात्र, त्याबदल्यात नवीन यंत्रे लावलेली नाहीत. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडल्यास मनपाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळील इंदिरा गांधी चौकात केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय आहे. तेथे मनपाच्या ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग समितीचा कारभार चालतो. तेथील नागरी सुविधा केंद्रात मालमत्ताकर, पाणीबिले भरण्यासाठी , विविध तक्रारी, समस्यांचे अर्ज देण्यासाठी, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणीसाठी नागरिक दररोज  येतात. या कार्यालयात आग अथवा शॉर्टसर्किटसारखी एखादी दुर्घटना घडल्यास  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ती विझविण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये ८५ अग्निरोधक यंत्रे बसविली होती. या यंत्रांवरील स्टिकरवर त्याची मुदत एक वर्षाची असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये ती बदलणे गरजेचे होते. मात्र, तरीही ती बदललेली नव्हती.
भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेमुळे जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने मंगळवारी डोंबिवलीतील कार्यालयातील अग्निरोधक यंत्रे काढून नेली. मात्र, त्या जागी नवीन यंत्रे लावलेली नाहीत. 
दरम्यान, केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. या कार्यालयात एखादी आगीची दुर्घटना घडल्यास हाहाकार उडण्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे केंद्र शहराबाहेर आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत घटनास्थळी बंबांना पोहोचण्यास विलंब लागू शकतो. या सर्व शक्यता गृहीत धरून तातडीने अग्निरोधक यंत्रे बसविण्याची मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे. 

अग्निरोधक बाटल्यांचे रिफिलिंग व्हावे, असा सर्वसाधारण नियम आहे. पण ते जरी केले नसले तरीही लगेच ते कालबाह्य झाले असे होत नाही. दोन वर्षांत रिफिलिंगकेले नसल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून ते नेण्यात आले असतील.
- दिलीप गुंड, 
अग्निशमन अधिकारी, केडीएमसी

Web Title: KDMC removes 'she' fire extinguishers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.