केडीएमसीचा तीन बड्या बिल्डरांना दणका, बेकायदा होर्डिंग प्रकरणी कोट्यवधींचा दंड
By मुरलीधर भवार | Published: October 10, 2023 09:23 PM2023-10-10T21:23:44+5:302023-10-10T21:27:46+5:30
आम आदमी पार्टीचे २७ दिवसापासून सुरु असलेले आंदोलन मागे
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या तीन बड्या बिल्डरांनी बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग लावल्या प्रकरणी त्यांच्याकडून जाहिरात होर्डिंगची रक्कम वसूल करण्यात यावी. या मागणीसाठी आम आदमी पार्टीने २७ दिवसापासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरु ठेवले हाेते. आज अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र येत्या सात दिवसात संबंधित बिल्डरांकडून रक्कम वसूल केली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर पूर्व सूचना न देता घंटानाद आंदोलन करण्या येईल असा इशारा आम आदमी पार्टीने प्रशासनाला दिला आहे.
आम आदमी पार्टीचे जि्ल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह महापालिका मुख्यालयासमोर कार्यालयीन वेळेत आंदोलन सुरु केले होते. २७ दिवसापासून हे आंदोलन सुरु होते. बेकायदा होर्डिंग उभारून जाहिरात करणाऱ््या बिल्डरांना दंड आकारण्यात यावा अशी त्यांची मागणी होती. आंदोलनकर्त्यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाईचे
लेखी आश्वासन दिले गेले आहे. त्यानंतर आज सायंकाली आंदोलन मागे घेतले गेले.
मायक्रोटेक्स डेव्हलपर्स या बिल्डरला ७० लाख ५२ हजार ८४८ रुपये, आऊट अ’ण्ड आऊट इन्फोटेकला १ कोटी ५४ लाख ४३ हजार ७८ रुपये आणि रुनवाल रेसिडेन्सीला ७९ लाख ७९ हजार ६१६ रुपये दंड आकारण्यात आला आहे. या बिल्डर कंपन्यांनी येत्या १५ दिवसात रक्कम भरावी अशी नोटिस मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी बजावली आहे.
ही रक्कम ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्तांकडे जमा करावी. ही रक्कम भरली तर जाहिरात होर्डिंग नियमित करण्यात येतील. अन्यथा त्या विरोधात कारवाई केली जाईल असे नोटिसमध्ये बजाविण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्तांनी ही रक्कम भरुन घेण्यात हयगय केल्यास सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.