केडीएमसी, उल्हासनगरला पार्किंगसाठी फिरा दारोदार! रस्त्यावरच गाड्या उभ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:16 AM2024-01-10T08:16:34+5:302024-01-10T08:17:51+5:30
दरवर्षी ७६ हजार नवी वाहने होतात दाखल; उल्हासनगर मनपाची पार्किंग व्यवस्था नाही
प्रशांत माने/ सदानंद नाईक/ पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: शहरांचा विस्तार होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी; तसेच बेभरवशाची असल्याने खासगी वाहने वापरण्याकडे कल वाढल्याने वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत कमालीची वाढली आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या पाच शहरांचा अंतर्भाव असलेल्या कल्याण आरटीओ क्षेत्रात दरवर्षी सरासरी ७६ हजार नव्या वाहनांची भर पडत आहे. वाहने भारंभार वाढत असताना पार्किंगचा प्रश्न किचकट बनल्याने ‘पार्किंगसाठी फिरा दारोदार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
पाच शहरे सध्या विकासाच्या माध्यमातून कात टाकत आहेत. येथील बहुतांश बांधकामे जुनी आहेत. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. वाहनांची गर्दी आणि अरुंद रस्ते हेच शहरातील वाहतूककोंडीचे प्रमुख कारण असले, तरी बेशिस्त वाहतूक आणि कुठेही बिनदिक्कत केले जाणारे वाहनांचे पार्किंग हेदेखील कोंडीला हातभार लावत आहे. मोठ्या गृहसंकुलांना; तसेच नव्या बांधकामांना बंधनकारक केलेली पार्किंग व्यवस्था आता अपुरी पडू लागली आहे.
पार्किंगवरून वादावादीचे प्रकार घडत आहेत. जागेअभावी गृहसंकुलांबाहेर रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जात आहेत. यंदाच्या वर्षात आतापर्यंत १४ हजार १४७ नव्या मोटारी, तर ५५ हजार ७८७ नव्या दुचाकींची भर पडली आहे. बदलापूरमध्ये वाहनतळ पुरेसे नसल्याने रस्त्यांवर वाहने बेकायदा पार्क केली जात आहेत. डोंबिवलीत पी.पी.चेंबर, पाटकर प्लाझा, राजाजी पथ, राथ रोड, तसेच पश्चिमेकडील रेल्वेचे पार्किंग, ठाकुर्ली रेल्वेस्थानकाबाहेर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. या जागा अपुऱ्या पडत असल्याने एकामागोमाग दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. हेच चित्र ठाकुर्लीतील म्हसोबा चौकात दिसते.
कोविडमुळे निविदा प्रक्रिया न पार पडल्याने वाहनतळ सुरू केली नव्हती; परंतु आता कपोते आणि पाटकर प्लाझा येथील वाहनतळ सुरू करण्याबाबतच्या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. पाटकर प्लाझा हे सुरू झाले आहे. ठाकुर्लीत दोन ठिकाणी वाहनतळ प्रस्तावित आहेत. त्याच्याबरोबर पार्किंग धोरण राबविण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे.
- वंदना गुळवे, उपायुक्त मालमत्ता विभाग, केडीएमसी
उल्हासनगरमधील कॅम्प नं. ४ ठिकाणी रेल्वेस्थानक परिसरात दोन खासगी पार्किंग व्यवस्था आहेत. त्या जागा उल्हासनगर महापालिकेच्या आहेत, असे बोलले जाते. नेहरू चौक, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक येथेही खासगी पार्किंग व्यवस्था आहे; मात्र मनपाची पार्किंग व्यवस्था नाही. वाहनतळ तसेच पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारक रस्त्यांच्या कडेलाच वाहने पार्क करीत असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसून कोंडी होत आहे.
कल्याणला वाहनतळ अपुरे
कल्याण रेल्वेस्थानक परिसरात चार वाहनतळ आहेत. यातील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. उर्वरित वाहनतळ वाढत्या वाहनांमुळे अपुरे पडत आहे.
अंबरनाथ काय स्थिती?
- अंबरनाथ पश्चिमेला दोन वाहतनतळ आहेत. त्यातील एक एसटी महामंडळाचे आहे, तर दुसरे अंबरनाथ नगरपालिकेचे वाहनतळ अपुरे पडत आहे.
- पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि स्टेट बँकेसमोर असलेली वाहनतळेदेखील पुरेशी नाहीत. दोन्ही शहरांमध्ये रेल्वेस्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. अंबरनाथ नगरपालिकेसाठी निधी मंजूर झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावरच वाहनतळांची समस्या निकाली निघेल, असा दावा केला जात आहे.