केडीएमसीच्या घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, तीन महिन्याचा पगार थकला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 04:25 PM2021-01-20T16:25:08+5:302021-01-20T16:25:36+5:30
KDMC : महापालिकेच्या घंटागाड्यांवर कचरा गोळा करण्याचे काम करणारे कामगार कंत्राटी आहे. विशाल एक्सपर्ट या कंपनीकडे ते काम करतात.
कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी घंटागाडी कामगारांचा तीन महिन्यापासून पगार थकल्याने आज कामगारांनी काम बंद आंदोलन केले. थकीत वेतनाच्या मागणीसाठी त्यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. त्यांच्या या आंदोलनास शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे. कामगारांच्या शिष्टमंडळास गायकवाड यांनी प्रशासनाची भेट घेतली. थकीत पगार केव्हा देणार याची जाब विचारला.
प्रशासनाकडून काही तांत्रिक अडचणीचा पाढा वाचण्यात आला. लवकरच हा पगार दिला जाईल असे आश्वासित करण्यात आले आहे. महापालिकेच्या घंटागाड्यांवर कचरा गोळा करण्याचे काम करणारे कामगार कंत्राटी आहे. विशाल एक्सपर्ट या कंपनीकडे ते काम करतात. विशाल एक्सपर्ट या कंपनीने हे कंत्राट घेतले आहे. कंपनीकडून केलेल्या कामाचे बिल सादर केले जाते. मात्र ते बिल मंजूर होण्यास विलंब होतो. त्यामुळे कामगारांच्या हाती वेळेत पगार मिळत नाही.
कामगारांचा थकीत पगाराप्रकरणी गेल्या महिनातही नगरसेवक गायकवाड यांनी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतरही पगार काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आज पुन्हा संतप्त कामगारांनी चार तास काम बंद आंदोलन करुन मुख्यालयात धाव घेतली. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले की, कोरोना काळात जीवावर उदार होऊन घंटागाडी कामगारांनी कचरा उचलण्याचे काम केले आहे.
कोरोना संकट काळात काम करणाऱ्या कामगारांचा पगार थकविणो ही कितपत योग्य गोष्ट आहे असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील कायम स्वरुपी असलेल्या सफाई कामगारांचा पगार महापालिका वेळेत देते. तसेच त्यांना सातव्या वेतन आयोगही मंजूर केला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पगारात वेतन आयोग दिला जाणार आहे. कायम स्वरुपी कामगारांना पगार व भत्ते, आयोगाचा फायदा दिला जात असताना कंत्रटी कामगारांच्या वेतनाबाबत प्रशासनाने उदासीनता दाखवून तात्रिक अडचणीची कारणो पुढे करणो हा प्रशासनाचा भेदभाव आहे.