केडीएमसीची प्लास्टीक विरोधात कारवाई वसूल केला २५ हजार रुपयांचा दंड
By मुरलीधर भवार | Published: January 11, 2024 04:31 PM2024-01-11T16:31:54+5:302024-01-11T16:33:41+5:30
प्लास्टीकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कल्याण -कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही व्यापारी प्रतिबंधित प्लास्टीकचा वापर करीत असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आज कारवाई करण्यात आली.
व्यापाऱ्यांकडून २ किलो ३०० ग्रॅम प्लास्टिक जप्त केले आहे. प्लास्टीकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जे व्यापारी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करीत होते. त्या ७५ व्यापाऱ्यांना महापालिकेने महिला बचत गटाकडून तयार करण्यात आलेल्या ७५० कापडी पिशव्या दिल्या आहेत. राज्य सरकारने मार्च २०१८ पासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तरी देखील त्याचा वापर केला जात आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यावधी रुपयांच्या शेतमालाची उलाढाल होते. त्यासाठी शेतमाल पाच ते दहा किलो देण्याकरीता व्यापारी प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करतात. त्यांनी प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद करावा.
व्यापारी वर्गाकडून कापडी पिशवी दिली जावे. ग्राहकांनी प्लास्टीक पिशवीच दिली नाही तर ग्राहक कापडी पिशवीचा वापर करतील याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष वेधले आहे. विक्रेता आणि ग्राहकाकडे प्लास्टिक पिशवी आढळून आल्यास पहिला गुन्हा पाच रुपये दुसरा गुन्हा दहा हजार रुपये आणि तिसरा गुन्हा २५ हजार रुपये दंड आकारला जातो. नागरीकांनी आणि व्यापारी वर्गाने प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्याचा वापर करुन अप्रिय दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.