'त्या' वादग्रस्त बेकायदा इमारतीवर केडीएमसीची कारवाई
By मुरलीधर भवार | Published: May 10, 2023 07:17 PM2023-05-10T19:17:32+5:302023-05-10T19:17:56+5:30
ही कारवाई करतेवेळी पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.
डोंबिवली - शहराच्या पूर्व भागातील मानपाडा राेडवरील गावदेवी मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या त्या वादग्रस्त सात मजली इमारतीवर आज कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे. ही कारवाई करतेवेळी पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.
सात मजली बेकायदा इमारत प्रकरणी मनसेने फाेटाेसह ट्वीट केले हाेते. त्यानंतर ही इमारत चर्चेत आली हाेती. ६५ बेकायदा इमारती प्रकरणी आवाज उठविणारे वास्तूविशारद संदीप पाटील यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली हाेती. या बेकायदा इमारतीवर कारवाई हाेणार हे अटळ हाेते. मात्र कारवाईसाठी पाेलिसांकडून बंदाेबस्त उपलब्ध हाेत नव्हता. अखेरीस महापालिका आणि पाेलिस यंत्रणा यांच्या कारवाईकरीता समन्वय नसल्याचा आराेप करीत तक्रारदार पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन या बेकायदा इमारतीच्या बांधकामास स्थगिती आदेश द्यावेत अशी मागणी केली. त्या पश्चात आज या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात आली.
जमीन मालक केतन दळवी, बिल्डर ब्रिजेश पांडे जयकुमार माैर्या यांनी आरसीसी तळ अधिक सात मजली इमारतीचे बांधकाम केले. महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे आणि बेकायदा बांधकाम विराेधी विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईस विराेध हाेण्याची शक्यता हाेती. त्यामुळे टिळकनगर पाेलिस ठाण्याकडून पाेलिस बंदाेबस्त पुरविण्यात आला हाेता. एक पाेकलेन, जेसीबी, सात ब्रेकर आणि २५ कामगारांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.