कोरोनाच्या निर्बंधाबाबत केडीएमसीचा दुजाभाव, कोरोना आमच्यामुळेच पसरतो का? फेरीवाल्यांमध्ये पसरला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:25 AM2021-04-03T02:25:34+5:302021-04-03T02:26:31+5:30
केडीएमसी हद्दीत कोरोनाचे दिवसाला ९०० रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी मनपाने सर्व दुकाने व आस्थापने शनिवार, रविवारी बंद ठेवण्याचा आदेश काढला होता; मात्र व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी हा आदेश मागे घेतला.
कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे दिवसाला ९०० रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी मनपाने सर्व दुकाने व आस्थापने शनिवार, रविवारी बंद ठेवण्याचा आदेश काढला होता; मात्र व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी हा आदेश मागे घेतला. परंतु, फेरीवाल्यांना या दोन दिवशी व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी कायम ठेवला आहे. आयुक्तांच्या या आदेशातून प्रशासन फेरीवाल्यांसोबत दुजाभाव करीत असून कोरोना केवळ फेरीवालेच पसरवित आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
भाजीपाला व फेरीवाला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. आयुक्तांनी सर्व दुकाने, आस्थापना शनिवार आणि रविवारी बंद करण्याचा निर्णय होळीच्या अगोदर घेतला होता. दुकानदारांनी शनिवारचा बंद पाळला. मात्र, होळीला सूट देण्याचा आग्रह धरला. त्यावेळी एक दिवसाची सूट देत शनिवारी, रविवारी सर्व दुकाने बंदच राहतील, या मुद्यावर आयुक्त ठाम होते. त्यानंतर सर्व दुकाने शनिवारी, रविवारी सुरू राहतील, असे आदेश काढले. मात्र फेरीवाल्यांना रविवारी, सोमवारी बंद ठेवण्यास सांगितले आहे.
‘मग आमच्या पोटावर पाय का?’
फेरीवाल्यांचे पोट हातावरचे आहे. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू केल्याने फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यातून आता कुठे ते सावरत असताना त्यांच्यावर निर्बंध घालणे म्हणजे फेरीवाल्यांवर प्रशासनाचा अन्याय आहे.
रेस्टाॅरंट, हॉटेल, बार यांना जास्तीची वेळ दिली आहे. दारूची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा आहे. मात्र, आम्हाला पोट भरू दिले जात नाही, याकडे फेरीवाल्यांनी लक्ष वेधले आहे.
१० हजारांपेक्षा जास्त फेरीवाले असून, त्यांच्यावरील निर्बंध हटवावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून फेरीवाले धंदा करण्यास तयार आहेत. या मागणीचा विचार प्रशासनाने न केल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.