आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी KDMC ची विक्रमी वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:07 PM2021-04-01T18:07:04+5:302021-04-01T18:07:31+5:30
KDMC : ही वसुली महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकीय उद्दिष्ट 425 कोटी असताना मालमत्ता कर संकलन विभागाने एकूण 427.50 कोटी विक्रमी वसुली केली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने दि.31 मार्च रोजी एका दिवसात तब्बल 10. 78 कोटींची वसूली करून या आर्थिक वर्षात एकूण 427 कोटीहून अधिक वसुली केली आहे. ही वसुली महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे. (KDMC's record recovery on the last day of the financial year)
15 ऑक्टोबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या 3 महिन्याचे कालावधीकरीता 75 % व्याज माफीची अभय योजना कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली होती. या योजनेला करदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत या कालावधीत 230.85 कोटी वसूलीस हातभार लावला होता. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या कर्मचारी वर्गाने देखील पाणी बिलांच्या वसुली पोटी एकूण 66.94 कोटीची वसुली केली आहे. गतवर्षी ही वसूली 61.10 कोटी इतकी होती. कोरोना साथीच्या या कठीण परिस्थितीतही महापालिकेच्या करदात्यांनी करांचा भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबाबत महापालिकेने करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत.
'करवसुली झाली असली तरी, शहरातील समस्याही लवकर मार्गी लावाव्यात'
केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी अनेकदा आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. वास्तविक पाहता कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा वेगवेगळ्या कामात गुंतलेली असताना कर वसुली करणे सोपे नव्हते. परंतु पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना इतर कामांना गती मिळणे देखील आवश्यक होते. सूर्यवंशी यांच्या कणखर नेतृत्वामुळे ही करवसुली झाली असली तरी शहरातील पाणी, रस्ते व कचरा समस्याही लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा करदाते नागरिक करत आहेत.