नवरात्र निमित्त केडीएमसीचा महिला आरोग्याचा जागर
By मुरलीधर भवार | Published: September 22, 2022 05:23 PM2022-09-22T17:23:22+5:302022-09-22T17:25:32+5:30
नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून
कल्याण- नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. यानिमित्त कल्याणडोंबिवली महापालिकेच्या वतीने माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमे अंतर्गत १८ वर्षावरील महिला व गरोदर मातांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी मोहिम २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर अशी नऊ दिवस चालणार आहे.
या मोहिमेचा शुभारंभ २६ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महापालिका रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबर्पयत आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबीरामार्फत १८ वर्षावरील महिला, गरोदर माता याची तपासणी, औषधोपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पोषण आहार विषयक माहिती, मातांचे वजन, उंची तपासली जाणार आहे.
रक्त, रक्तदाब, लघवी, लसीकरण, दंतरोग आदी तपासण्या केल्या जाणार आहेत. गरोदर मातांमध्ये अतिजोखणीच्या मातांची सोनोग्राफी करण्यात येईल. तसेच ३० वर्षावरील महिलांची कर्करोग तपासणी, रक्तदाब, मधूमेह तपासणी केली जामार आहे. या आरोग्य मोहिमेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा यासाठी आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत माहिती दिली जाणार आहे. स्त्री शक्तीचा आदर आणि आरोग्याची काळची हाच या आरोग्य मोहिमे मागचा मुख्य हेतू असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.